पिंपळे गुरव : राजमाता जिजाऊ उद्यान सन 2007 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात नागरिकांसाठी खुले करण्यात आले. परंतु, तब्बल 17 वर्षांनंतरही या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर राजमाता जिजाऊ उद्यान असा अधिकृत नामफलक लावण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
उद्यानाचे उद्घाटन, विकासकामे, देखभाल दुरुस्ती यासाठी करोडो रुपयांचा निधी वापरला गेला. परंतु, उद्यानाची मूलभूत ओळख सांगणारा नामफलक बसवला गेला नाही. यामुळे नागरिकांनी संबंधित विभागाच्या कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उद्यानाच्या दुरुस्ती मार्गांची स्वच्छता, खेळणी, व्यायाम साधनांची देखभाल, वृक्षसंवर्धन, सुरक्षाव्यवस्था आणि इतर नियमित कामांवर महापालिकेकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. याशिवाय नागरिकांकडून आकारल्या जाणाऱ्या प्रवेश शुल्कामुळे उद्यानाला दरवर्षी सुमारे 70 ते 80 लाख रुपये महसूल मिळतो. एवढा मोठा आर्थिक महसूल मिळत असताना नामफलकासाठी कोणतीही तरतूद नसणे ही प्रशासनाची उद्यानाविषयीची बेफिकिरी असल्याचे नागरिकांचे मत आहे. पिंपळे गुरवमधील लोकप्रिय उद्यान असूनही नामफलक नसणे ही उद्यानाच्या ओळखीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. राजमाता जिजाऊ उद्यानाला त्याची खरी ओळख म्हणजे नामफलक लवकरात लवकर प्रवेशद्वारावर बसविण्यात यावा, अशी प्रामुख्याने मागणी होत आहे.
पिंपळे गुरवमधील ज्येष्ठ नागरिकांपासून मुलांपर्यंत हजारो नागरिक रोज या उद्यानाचा वापर करतात. बालकांसाठी खेळणी, व्यायाम साधने, धावण्यासाठी ट्रॅक अशा सर्व सुविधा असतानाही प्रवेशद्वारावर उद्यानाचे नावच नसल्याने पहिल्यांदाच येणाऱ्या नागरिकांना हे उद्यान नेमके कोणते, कुठे आणि कोणत्या नावाने ओळखले जाते याचा पत्ता लागत नाही. त्यामुळे उद्यानाचे अधिकृत नाव स्थापना वर्ष याची माहिती देणारा फलक लावणे गरजेचे आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावर नामफलक नसणे हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे का, की केवळ उद्यान विभागाचा सुस्त कारभार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विद्युत रोषणाईचा नामफलक तयार करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी विद्युत विभागाला पत्र दिलेले आहे. नामफलक तयार झाल्यावर लवकरच तो प्रवेशद्वारावर लावण्यात येईल.जे. डी. देवकर, उपअभियंता, उद्यान स्थापत्य विभाग.
प्रशासनाने ज्या पद्धतीने कामे, देखभाल दुरुस्ती यावर निधी खर्च केला त्यात नामफलकाचा विचार झाला नाही. हे समजतच नाही एवढ मोठे उद्यान असूनही ते नामफलकाविना ठेवले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर नामफलक लावावा.बाळासाहेब देवकर, स्थानिक नागरिक.
व्हर्टिकल गार्डन असल्याने किंवा जागेअभावी नामफलक लावला गेला नसेल. याबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेत आहोत. नामफलक लावण्यासाठी जागा उपलब्ध असल्यास ते लावण्यात येईल. तसेच पूर्वी नामफलक बसवला नसेल तर त्याबाबत चर्चा करून नामफलक बसविण्याची कार्यवाही करण्यात येईल.विजय जाधव, कार्यकारी अभियंता, उद्यान स्थापत्य विभाग, मनपा.