वर्षा कांबळे
पिंपरी: दीपावलीसाठी घर परिसर उजळून टाकणाऱ्या रंगबेरंगी विविध आकारांतील पणत्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. विविध रंगसंगतीच्या पणत्या, विविध आकारातील लामण दिवे, कुंदन, खडे, टिकल्या, चमक्या अशा अनेक विविध कलाकुसरीने घडवलेल्या पणत्या विक्रीस आल्या आहेत. यंदाही राजस्थानी टेराकोटा मातीपासून बनविलेल्या दिव्यांची छाप बाजारात दिसून येत आहे.
दिवाळीसणाला आणखीच प्रकाशमान करण्यासाठी विविध प्रकारांचे दिवे व पणत्याची नागरिकांकडून आत्ताच खरेदी केली जात असून, बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसत आहे. नेहमी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक मातीच्या पणत्याबरोबर आता प्लास्टिकच्या, काचेच्या, चिनी मातीच्या सुंदर नक्षीदार पणत्यादेखील विक्रीस आल्या आहेत. तसेच, मातीच्या पणत्यांवर आकर्षक कोरीव नक्षीकाम केलेल्या, विविध आकाराच्या पणत्या बाजारात उपलब्ध आहेत. गोल, चौकोनी, षटकोनी आकाराच्या दिवे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.
विविध रंगांनी सजवलेल्या चंदेरी-सोनेरी नक्षीकाम केलेल्या पणत्यांनाही ग्राहकांची विशेष पसंती आहे. हे दिवे प्रत्येकी पाच रुपयाला एक आणि 50 रुपये डझन या किंमतीला आहेत. लामण दिवे व मोठे दिवे हे 50 पासून ते 150 रुपयांपर्यत उपलब्ध आहेत. या विविध प्रकारांच्या आकर्षक पणत्या व दिवे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पारंपरिक पणत्यांबरोबर गुजराती व राजस्थानी पद्धतीच्या टेरोकोटा पद्धतीच्या पणत्यादेखील दरवर्षी मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. यामध्ये घर, कंदील, शंख, समई, हत्ती, हंस, अंबारी, तुळशीवृंदावन अशा विविध आकारातील दिवे त्यावर केलेले बारीक कलाकुसर हे त्याचे वैशिष्ट्ये आहे.
विविध रंगांनी सजवलेल्या चंदेरी-सोनेरी नक्षीकाम केलेल्या छोट्या आकरातील पणत्यांनाही ग्राहकांची विशेष पसंती आहे. हे दिवे प्रत्येकी पाच रुपयाला एक आणि 50 रुपये डझन या किंमतीला आहेत. लामण दिवे व मोठे दिवे हे 150 पासून ते 350 रुपयांपर्यत उपलब्ध आहेत. पारंपरिक पणत्याही बाजारात बाजारात रंगविलेल्या पणत्यांबरोबरच पारंपरिक मातीच्या पणत्यादेखील आहेत. या पणत्यांनादेखील मागणी आहे. हौशी कलाकार घरीच रंगरंगोटी आणि सजावट करून दिवाळीसाठी हे दिवे वापरतात. तसेच, पॅकिंग करून नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींनादेखील दिवाळीची भेट म्हणून देतात.