

शेळगाव : इंदापूर-बारामती संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील शेळगाव पाटी (ता. इंदापूर) येथे उड्डाणपुलावरआयशर टेम्पो व महिंद्रा कंपनीचा मॅक्स आय चारचाकी गाडीचा समोरासमोर झालेल्या धडकेत हगारेवाडी (ता. इंदापूर) येथील २० वर्षे प्रतीक विशाल हगारे या युवकाचा जागीच मृत्यू झाला.(Latest Pune News)
शुक्रवारी (दि. १०) सकाळी ६ वाजता हा अपघात झाला. बारामतीकडून इंदापूरच्या चाललेल्या मॅक्स आय गाडीची व इंदापूरहुन बारामतीकडे निघालेल्या आयशर टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यामध्ये मॅक्स आय गाडीचा चालक प्रतीक हगारे याचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो चालक गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्रतीकच्या मागे आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. प्रतीक हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती निधनाने हगारेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.पुढील घटनेचा तपास वालचंदनगर पोलीस करित आहेत.