Raghuvir Tukaram Khedkar Honour Pudhari
पिंपरी चिंचवड

Raghuvir Tukaram Khedkar Honour: पिंपरी-चिंचवडमध्ये पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांचा नागरी सन्मान

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महापालिकेकडून गौरव; लोककला जतनासाठी आयुष्य अर्पण केलेल्या कलावंताला सलाम

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते मानपत्र, भक्ती-शक्ती समूह शिल्प प्रतिकृती तसेच, सन्मानचिन्ह देऊन नागरी सन्मान करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे शुक्रवारी (दि.27) कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमास महापौर लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे तसेच, मारुती भापकर, अरुण बोऱ्हाडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, रघुवीर खेडकर यांचे सहकारी शफी शेख आदी उपस्थित होते.

महापौर लांडगे म्हणाले की, खेडकर यांचे कार्य केवळ तमाशा या कलेपुरते मर्यादित नसून मराठी भाषा, संस्कृती आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. अशा महान लोककलावंताचा सन्मान करणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. विरोधी पक्षनेते भोईर म्हणाले की, पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर हे आधुनिक लोककलेची गंगोत्री आहेत. खेडकर म्हणजे महाराष्ट्र आणि लोककलेचे प्रतीक आहेत. तमाशा म्हटले की खेडकर यांचे नाव समोर येते. हा सन्मान केवळ त्यांचा नसून आपल्या संपूर्ण शहराचा सन्मान आहे. उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, महान लोककलावंताचा सन्मान होणे ही आपल्या शहरासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल. किरण गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. राजू मोहन यांनी सूत्रसंचालन केले.

शाहिरी, लोकगीतातून मराठी संस्कृतीला मानवंदना

लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटरतर्फे माय मराठीची गौरवगाथा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची सुरुवात होताच प्रेक्षागृहात महाराष्ट्रप्रेमाची लहर उसळली. विविधरंगी सादरीकरणांनी कार्यक्रम रंगत गेला. संदेश विठ्ठल उमप यांना प्रवीण डोणे, विजय कर्जावकर, धीरज पारकर, रागिणी मुंबईकर, कोमल दांडे, वैशाली गोखले, प्रज्ञा वळंजू या गायकांनी सुरेल साथ दिली. संतोष लिंबोरे यांनी निवेदन केले. शाहीर पृथ्वीराज माळी यांनीही दमदार आवाजातून पोवाडा सादर केला. त्यांना शाहीर अभंगराज माळी, अवधूत पवार, आदिती पवार यांनी साथ दिली. ढोलकीवर राजू घोलप यांच्या ठेक्यांनी सभागृह दणाणून गेले.

उद्योनगरीतील सन्मान हा सर्व कलावंतांचा गौरव

कष्टकऱ्यांची उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेने माझा नागरी सन्मान करून प्रत्यक्षात सर्व कलावंतांचा गौरव केला आहे. आयुष्यभर ज्या कलेने मला ओळख दिली, त्या कलेच्या माध्यमातून मी पुढेही निष्ठापूर्वक लोकांची सेवा करत राहीन. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मला खरंच धक्का बसला. सरकारने माझ्यासारख्या तमाशा कलावंताची दखल घेतली याचा आनंदही झाला आणि अभिमानही वाटला. कला जपत असताना सामाजिक कार्यातही हातभार लावण्याचा प्रयत्न केला. स्वतः छोट्या खोलीत राहिलो, पण सहकार्यांना पक्की घरे उभी करून दिली. घरची परिस्थिती खूपच कठीण होती. त्यामुळे पाचवीत असतानाच शाळा सोडली आणि आईसोबत तमाशात काम सुरू केले, असे प्रतिपादन रघुवीर खेडकर यांनी सत्काराला उत्तर देताना केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT