Ring Road Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Pimpri Inner Ring Road: पुणे-पिंपरीच्या इनर रिंगरोडसाठी भूसंपादनाला वेग; बाधित शेतकऱ्यांशी थेट संवाद

हवेली, मावळ, मुळशीत ग्रामबैठका व संयुक्त मोजणी; संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक मोबदल्याची पीएमआरडीएची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून आखण्यात आलेल्या ६५ मीटर रुंदीच्या 'इनर रिंगरोड' प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) बाधित शेतकरी व खातेदारांशी थेट संवाद साधण्यासाठी हवेली, मावळ आणि मुळशी तालुक्यांत विशेष ग्रामबैठकांचे, तर मुळशी व हवेली तालुक्यांत संयुक्त मोजणीचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक रकमेचा लाभ देण्याची ग्वाही 'पीएमआरडीए'ने दिली आहे. तसेच, १४४ कोटींचा मोबदला 'पीएमआरडीए'कडून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी यापूर्वी खेड तालुक्यातील सोळू तसेच हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे व निरगुडी येथील जमिनींची मोजणी पूर्ण झाली असून, 'पीएमआरडीए'तर्फे १४४ कोटींचा निधी मोबदल्यापोटी वर्ग करण्यात आला आहे. आता उर्वरित आवश्यक जमिनींच्या संपादनासाठी मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील गावांसाठी ऑक्टोबर महिन्याचे विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ७ ऑक्टोबरपासून ही मोहीम वेगाने राबवली जात आहे.

स्थानिक शेतकरी व खातेदारांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान मावळ आणि हवेली तालुक्यांत ग्रामबैठका पार पडत आहेत. यामध्ये ७ ऑक्टोबर रोजी साळुंब्रे व दारुंब्रे (ता. मावळ) तसेच मांजरी खुर्द व वडकी (ता. हवेली) येथे बैठका पार पडल्या. तर दि. ८ ऑक्टोबर रोजी गोंडुबरे व परंदवडी (ता. मावळ), तर ९ ऑक्टोबर रोजी सांगवडे व धामणे (ता. मावळ) येथे ग्रामबैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, मुळशी तालुक्यातील बाधित गावांमधील खातेदारांशी थेट चर्चा करण्यासाठी मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑक्टोबर रोजी विशेष बैठकांचे सत्र पार पडणार आहे.

यामध्ये सकाळी १० वाजता बावधन बुद्रुक येथे पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीत पहिली बैठक होईल. त्यानंतर सुस येथे सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर सभागृहात, नांदे येथे दुपारी १२ वाजता भैरवनाथ मंदिर सभागृहात, माण येथे दुपारी १ वाजता आणि हिंजवडी येथे दुपारी २.३० वाजता ग्रामपंचायत सभागृहात बैठका पार पडतील. पुढे मारुंजी येथे दुपारी ३.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात, नेरे येथे दुपारी ४.३० वाजता भैरवनाथ मंदिरासमोर आणि जांबे येथे सायंकाळी ५.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात खातेदारांशी थेट संवाद साधला जाणार आहे. या बैठकींना पुणे महानगरपालिका आणि 'पीएमआरडीए'चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बाधित जमिनींचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी मुळशी व हवेली तालुक्यांत संयुक्त मोजणी मोहीम राबवली जाणार आहे. मुळशी तालुक्यात ९ ऑक्टोबरला नेरे येथून मोजणीला सुरुवात होणार असून, १२ ऑक्टोबरला हिंजवडी, १३ ऑक्टोबरला जांबे, १४ ऑक्टोबरला माण, १५ ऑक्टोबरला मारुंजी आणि १७ ऑक्टोबर रोजी नांदे येथे मोजणी पार पडेल.

तसेच, ३०० हून अधिक बाधित खातेदार असलेल्या हवेली तालुक्यात १३ ऑक्टोबर रोजी मांजरी खुर्द (१५५ खातेदार), १५ ऑक्टोबरला कोलवडी (२० खातेदार) आणि १६ ऑक्टोबर रोजी वडकी (१२५ खातेदार) येथील जमिनींची संयुक्त मोजणी केली जाणार आहे. मोजणीनंतरच मूल्यांकनाची रक्कम निश्चित करणे शक्य होणार आहे. या सर्व बैठकांना संबंधित बाधित खातेदारांनी स्वतः उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन 'पीएमआरडीए'च्या जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता तसेच उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी केले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 'इनर रिंगरोड' हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. स्थानिक नागरिकांनी व शेतकरीबांधवांनी ग्रामबैठका आणि संयुक्त मोजणीत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. संबंधित खातेदार शेतकरी व नागरिकांनी संमती दिल्यास त्यांना अधिक रक्कम मिळेल. तसेच, मोबदला वितरण आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक वेगाने होईल. प्रशासनावर सक्तीच्या भूसंपादनाची वेळ न आणता, संमती आणि सहकार्याच्या भावनेतून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पूनम मेहता, सहआयुक्त, जमीन व मालमत्ता विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT