Metro  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Pimpri Chinchwad Metro Reserved Seats: पुणे आणि पिंपरी-चिंचवड मेट्रोमध्ये महिला व ज्येष्ठांसाठी राखीव जागा

प्रत्येक ट्रेनमध्ये 54 जागा राखीव; महिला दिनापासून निर्णयाची अंमलबजावणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन (महामेट्रो) च्या प्रवासात महिला आणि ज्येेष्ठांसाठी राखीव जागा नसल्याने त्याची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर महिला आणि ज्येष्ठांकडून राखीव जागा ठेवण्याची मागणी करण्यात आली होती.

ही मागणी लक्षात घेत मेट्रो व्यवस्थापनाने मेट्रोच्या तिन्ही डब्यांत महिला व ज्येष्ठांसाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक महिला दिन 8 मार्चपासून हा निर्णय लागू करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती पुणे मेट्रोकडून देण्यात आली आहे.

वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर सध्या मेट्रो धावत आहे. पिंपरी, संत तुकाराम नगर, भोसरी, (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, असे एकूण सहा थांबे आहेत. मेट्रोमधून सध्या दोन लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. यामध्ये महिला आणि ज्येेष्ठ नागरिकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. त्यामुळेच पुणे मेट्रोच्या प्रत्येक ट्रेनमधील तिन्ही डब्यांमध्ये महिला आणि ज्येष्ठांसाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या संदर्भात दैनिक पुढारीमध्ये वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. या वृत्ताची महामेट्रो व्यवस्थापकाने दखल घेत ज्येष्ठ आणि महिलांसाठी राखीव आसन करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रोचा प्रवास वेगवान व सुलभ असल्यामुळे मेट्रोच्या वाढलेल्या गर्दीमधून प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करावा लागत होता. मात्र आता गर्दीच्या वेळीही महिला तसेच ज्येष्ठ प्रवाशांची गैरसुविधा होणार नाही. त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे. आसनव्यवस्थेची सविस्तर माहिती पुणे मेट्रोच्या सर्व स्थानकांवर तसेच अधिकृत मोबाईल ॲपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मेटोच्या डब्यांमध्ये चिन्हांद्रारे राखीव जागा स्पष्टपणे दर्शविण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांना त्या सहज ओळखता येणार आहे. या राखीव जागांच्या नियमांचे पालन करून महिला व ज्येेष्ठ नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन महामेट्रो प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रत्येक ट्रेनमध्ये 54 जागा राखीव

पुणे मेट्रोच्या नियोजनानुसार, प्रत्येक ट्रेनमध्ये महिलांसाठी 46 जागा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 8 जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. कोचनुसार राखीव जागा :

  • पहिला कोच (डीएमए कार ) महिलासाठी 14, ज्येष्ठ नागरिक -2

  • मधला कोच - (टी- कार ) महिलांसाठी 18, ज्येष्ठ नागरिक 4

  • तिसरा कोच- (डीएमबी कार ) महिलांसाठी 14 ज्येष्ठ नागरिक 2

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT