

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील थकबाकीदारांना मालमत्ताकराचे बिले भरता यावीत म्हणून विलंब दंडात तब्बल 90 टक्क्यांची सवलत देण्यात आली आहे. त्या अभय योजनेला थकबाकीदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. योजना सुरू झाल्यापासून महापालिका तिजोरीत तब्बल 20 कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. तर, तब्बल 7 हजार 400 थकबाकीदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
शहरातील 2 लाख 12 हजार 440 मालमत्ताधारकांनी 28 फेबुवारीपर्यंत मालमत्ताकर भरलेला नव्हता. थकीत मालमत्ताकर वसुलीस गती देण्यासाठी 1 मार्चपासून महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून अभय योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व मोकळ्या जागा यांची थकबाकी एकरकमी भरल्यास विलंब दंडावर 90 टक्के सवलत दिली जात आहे. ती योजना 31 मार्चपर्यंत आहे.
त्या दोन 2 लाख 12 हजार 440 मालमत्ताधारकांनी बिल भरलेले नाही. निवासी मालमत्ता सर्वांधिक 1 लाख 80 हजार 27 इतक्या असून, थकबाकी तब्बल 404 कोटी 75 लाख इतकी आहे. तर, बिगरनिवासी 18 हजार 284 मालमत्ताधारकांकडे एकूण 341 कोटी 58 लाखांची थकबाकी आहे. पाच हजार 233 मिश्र मालमत्ताधारकांकडे 5 हजार 233, एक हजार 341 औद्योगिक मालमत्ताधारकांकडे 18 कोटी 2 लाख, पाच हजार 308 मोकळ्या जमीनधारकांकडे एकूण 374 कोटी 41 लाख आणि इतर 247 जणांकडे 40 लाखांची थकबाकी आहे.
योजना लागू झाल्यापासून थकबाकीदारांकडून संपूर्ण बिल भरण्यात येत आहे. रविवार (दि.1) पासून शुक्रवार (दि.6) पर्यंत सहा दिवसांत तब्बल 7 हजार 378 मालमत्ताधारकांनी एकूण 19 कोटी 89 लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यांना विलंब दंडात मोठी सूट मिळाली आहे.
संपूर्ण बिल भरून सवलतीचा लाभ घ्या
पाच, दहा तसेच पंधरा वर्षे थकलेली बिले नागरिक भरून अभय योजनेतील मोठ्या सवलतीचा लाभ घेत आहेत. दररोज 5 कोटी रुपयांचा भरणा होत आहे. शेवटच्या टप्प्यात त्यात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. नागरिकांना बिल भरण्यासाठी सर्व 18 विभागीय कार्यालयातील कॅश काउंटर सुटीच्या दिवशीही खुले ठेवण्यात आली आहेत. ही अभय योजना 31 मार्च महिन्यापुरती मर्यादित आहे. नागरिकांनी थकबाकीसह संपूर्ण बिल भरून भरघोस सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.