Pune Metro  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Metro Ganeshotsav: गणेशोत्सवात मेट्रोला पुणेकरांची पसंती; पहिल्याच दिवशी २.६२ लाख प्रवाशांचा प्रवास

गतवर्षीच्या तुलनेत २१.४० टक्के वाढ; गर्दी पाहता रात्री २ वाजेपर्यंत मेट्रो सेवा, दर पाच मिनिटांनी फेऱ्या

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी (१४ सप्टेंबर) पुणे-पिंपरी-चिंचवडकरांनी प्रवासासाठी मेट्रोला पसंती दिली असून, २ लाख ६२ हजार ६७१ जणांनी मेट्रोतून प्रवास केला. गतवर्षी बाप्पाच्या स्थापनेच्या दिवशी २ लाख १६ हजार ३७४ प्रवाशांनी प्रवास केला होता. त्याच्या तुलनेत यंदा ४६ हजार २९७ सुमारे म्हणजेच सुमारे २१.४० टक्के वाढ नोंदविण्यात आली. गणेशोत्सवात दर पाच मिनिटांनी मेट्रो धावत आहे.

गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवड परिसरातून पुण्यातील मानाचे गणपतींच्या दर्शनासाठी तसेच विविध ठिकाणचे देखावे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. यंदा गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मेट्रोच्या मुख्य स्थानकांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे प्रवासी संख्येवरुन दिसून येत आहे. महात्मा फुल मंडई स्थानकावर सर्वाधिक ५१ हजार ५३३ प्रवाशांची नोंद झाली आहे. जिल्हा न्यायालय स्थानकावर इंटरचेंज करणाऱ्या प्रवाशांची संख्या ५८ हजार ९४८ होती. गतवर्षीच्या तुलनेत या स्थानकांवरील इंटरचेंज प्रवाशांत २१.८९ टक्के वाढ झाली आहे.

पीसीएमसी स्थानकावर २५ हजार ४२९, रामवाडी स्थानकात २३ हजार ६४४, स्वारगेट स्थानकात २१ हजार ९९ आणि पीसीएमसी स्थानकात मेट्रो स्थानकात १९ हजार २६७ प्रवशांची नोंद झाली आहे. गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन मेट्रो प्रशासनातर्फे सेवेत बदल करण्यात आला असून, आता सेवा रात्री दोनपर्यंत सुरू राहणार आहे.

देखावे आणि गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कसबा पेठ, स्वारगेट, पीएमसी, डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान स्थानकांचा वापर करावा, तसेच परतीच्या प्रवासासाठी मंडई स्थानकाचा वापर करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. स्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी डिजिटल तिकीट प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा.

मेट्रोला प्रवाशांची गर्दी वाढत आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे मेट्रो गाड्या हाऊसफुल्ल धावत आहे. गणेशोत्सवात दर ५ मिनिटांनी मेट्रोच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा मेट्रो आणि प्रवाशांनी दोघांनाही होत आहे.
चंद्रशेखर तामवेकर, जनसंपर्क अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT