Tobacco Pudhari
पिंपरी चिंचवड

Tobacco Free Schools: पुणे जिल्ह्यात 2,322 संस्था तंबाखूमुक्त; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला मोठे यश

शाळा-महाविद्यालयांमध्ये व्यापक जनजागृती; 14 हजारांहून अधिकांना प्रशिक्षण, 1,275 जणांनी व्यसन सोडले

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रूग्णालय पुणेतर्फे शैक्षणिक संस्थांना तंबाखूमुक्त करण्यासाठीही व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. मार्च 2026 अखेर पुणे जिल्ह्यातील 2,322 संस्था तंबाखूमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी संस्कार रुजविण्यास मदत होत आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षामार्फत नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, पोलीस, वकील, पोलीस पाटील आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसाठी एकूण 87 प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले.

या प्रशिक्षणांचा लाभ तब्बल 14,687 व्यक्तींनी घेतला. यामध्ये 11,704 विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यामुळे शालेय व महाविद्यालयीन स्तरावर तंबाखूविरोधी जनजागृतीला मोठी चालना मिळाली आहे. लहान वयातच तंबाखूचे व्यसन लागल्याने तंबाखूमधील निकोटीनमुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच विचार करण्याची क्षमता कमी होते. मनाची एकाग््राता कमी होते. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच पण त्याबरोबरच भविष्य देखील खराब होते. मनपा आणि मराठी खासगी शाळांमधील बहुतांश मुले ही झोपडपट्टी भागातून येत असतात. त्यामुळे घरातील आणि आजूबाजूचे वातावरण यामुळे त्यांनाही व्यसन करण्याची इच्छा होते. यामध्ये गुटखा, बिडी, सिगारेट ओढण्याचे व्यसन लागते. हळूहळू हे व्यसन शाळेतील इतर मुलांना देखील लागते असे निदर्शनात दिसून आले आहे.

शाळांमध्ये तंबाखू मुक्त अभियान

शासनाच्या सूचनेनुसार सर्व मनपा व खासगी शाळांमध्ये तंबाखू मुक्त अभियान राबविले जात आहे. यामध्ये माध्यमिक विभागाच्या शाळांमध्ये हे अभियान राबविले जात आहे. शाळांमध्ये शाळेत तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी आणि समुपदेशन करणारी संस्था यांचा सहभाग आहे. शाळेच्या परिसरात धूमपान व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे गुन्हा आहे, असे फलक शाळेत महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत. तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायदा काय आहे, याची माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून कारवाईही करण्यात आली. वर्ष 2025-26 मध्ये 1,829 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून 84,600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूमपान, अल्पवयीनांना तंबाखू विक्री, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री यांसारख्या उल्लंघनांचा समावेश होता.

व्यसन सोडण्याकडे वाटचाल

तंबाखूमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (एनटीसीपी) पुणे जिल्ह्यात विविध स्तरांवर प्रभावी जनजागृती, प्रशिक्षण, समुपदेशन आणि कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे तंबाखू सेवनाविरुद्ध जनजागृती वाढत असून अनेक नागरिक तंबाखूचे व्यसन सोडण्याकडे वळत आहेत.

समुपदेशन आणि दंडात्मक कारवाई

तंबाखू व्यसनमुक्तीसाठी जिल्ह्यातील तंबाखू व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात समुपदेशन करण्यात आले. वर्ष 2025-26 मध्ये 12,206 रुग्णांना समुपदेशन सेवा देण्यात आली, तर त्यापैकी 1,275 व्यक्तींनी तंबाखूचे सेवन पूर्णपणे बंद केले. तसेच 175 समूह चर्चांचे आयोजन करून व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले.

तंबाखूला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार“ हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सातत्याने कार्यरत आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पोलीस यंत्रणा आणि विविध सामाजिक संस्थांच्या समन्वित प्रयत्नांमुळे पुणे जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात अधिकाधिक नागरिकांनी तंबाखूचे व्यसन सोडून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा.
डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT