

गणेश विनोदे
वडगाव मावळ: मावळ तालुक्यात आजही हातभट्टी दारू विक्री खुलेआम सुरू असून, फुगेवाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मावळातील अवैध दारूविक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दुर्दैवाने मावळात अशी घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मावळ तालुक्याच्या विशेषतः ग््राामीण भागात अजूनही हातभट्टी दारू विक्रीचे अड्डे सुरू आहेत. पोलिस प्रशासन किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अनेकदा कारवाई झाली तरी आजही मावळ तालुक्यात गावठी दारू सर्रासपणे विक्री केली जात आहे. गावठी दारू सहजपणे उपलब्ध होते, तसेच अत्यंत अल्प दरात मिळत असल्याने प्रामुख्याने ग््राामीण भागातील लोक, मोलमजुरी करणारे कामगार किंवा दारू पिऊन पिऊन हातगाईस आलेले दारूच्या व्यसनाधीन झालेले लोक गावठी दारूवर समाधान मानून आपली वेळ साजरी करत असतात.
परंतु, ही गावठी दारू आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक असते. गावठी दारूच्या विक्रीला कुठलीही परवानगी मिळत नाही परंतु, ती अवैधरित्या विक्री होते. गावठी दारू तयार करण्याचा व विक्री करण्याचा व्यवसाय एक विशिष्ट समाज करत असून, त्या समाजातील काही कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय होऊन बसला आहे. कितीही वेळ आणि कितीही कारवाई केली तरी त्यांच्याकडून वारंवार हाच व्यवसाय केला जातो.
मावळ तालुक्यात बहुतांश ठिकाणी गावठी दारूचे अड्डे आजही सुरू आहेत. यासंदर्भात ग््राामस्थांकडून अनेक तक्रारी झाल्या, पोलिस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाया झाल्या; परंतु आजही गावठी दारू मिळते हे विशेष आहे. फुगेवाडी येथे गावठी दारूतील मिथेनॉलच्या मिश्रणामुळे अनेकांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. हाच प्रकार भविष्यात मावळ तालुक्यात दुर्दैवाने घडू शकतो. त्यामुळे हातभट्टी गावठी दारूच्या उत्पादनाला व विक्रीला आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे.
भरवस्तीतील दारू अड्ड्याने वडगावकर हैराण; पोलिसही हतबल!
असाच एक गावठी दारूचा अड्डा वडगाव शहरातील गावठाण भागातील रहदारीच्या ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्या अड्ड्यावर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली, आमदार सुनील शेळके यांच्यासह नगराध्यक्षा अबोली ढोरे, माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, स्थानिक माजी नगरसेवक राहुल ढोरे यांनी थेट छापा टाकून हा अड्डा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु अजूनही त्याठिकाणी दारू अड्डा सुरू असल्याने वडगावकर हैराण झाले आहेत. पोलिस कारवाई करून करून हतबल झाले आहेत. या दारू अड्ड्यामुळे अनेकांचे जीव गेले असून हा अड्डा कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी होत आहे.
घातक रसायने, मिथेनॉलमुळे गावठी दारू घातक!
गावठी दारू ही सडलेला गूळ, मळी, मोहाची फुले अशा घटकांपासून बनवली जाते. लवकर नशा यावी व जास्त काळ टिकावी यासाठी या दारूमध्ये मिथेनॉल, युरिया, ऑक्सिटोसिन, प्रसंगी बॅटरीचे ॲसिडही मिसळले जाते. यामध्ये मिथेनॉल हे अत्यंत विषारी रसायन असून, त्याचा थोडा तरी अंश पोटात गेला तरी त्याचा परिणाम काही तासात डोळे, मेंदू, मूत्रपिंड, श्वसनसंस्थेवर होतो. फुगेवाडी येथील घटनेत मिथेनॉलचाच परिणाम असल्याचे समोर आले आहे.