

बजरंग मासाळ
पिंपरी: शहरातील नद्यांच्या संवर्धनासाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवल्या जात असताना प्रत्यक्षात मुळा नदीची अवस्था मात्र अत्यंत दयनीय असल्याचे वास्तव समोर आले आहे. मुळा नदी परिसरात केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत नदीकाठावर राडारोडा, कचऱ्याचे ढीग, फेसाळलेले पाणी, जलपर्णीचा साठा आणि नदीपात्रातील मानवी हस्तक्षेपाचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले.
फेसाळ पाणी अन् कचऱ्याचे साम्राज्य
नदी संवर्धन, स्वच्छता मोहीम आणि पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे मुळा नदी मात्र प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली दिसत आहे. अनेक ठिकाणी नदीकाठाचे नैसर्गिक स्वरूपच बदलून गेले असून, नदीचा श्वास गुदमरू लागल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
जलपर्णी काढली पण उचललीच नाही !
नदी स्वच्छतेसाठी काही भागांत जलपर्णी काढण्यात आल्याचे दिसले. मात्र, काढलेली जलपर्णी नदीकाठावरच टाकून दिल्याचे चित्र निदर्शनास आले. अनेक ठिकाणी ती वाळून सुकून गेली असतानाही तिची विल्हेवाट लावण्यात आलेली नव्हती. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास आणि कीटकांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केलेी आहे. नदी स्वच्छतेच्या कामांमध्ये केवळ दिखाऊपणा केला जात आहे का ? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
फेसाळलेले पाणी नेमके कुठून ?
काही भागात नदीचे पाणी फेसाळलेल्या अवस्थेत दिसून आले. पाण्यावर पांढऱ्या फेसाचे थर जमा झाल्याने नदीतील प्रदूषणाची तीव्रता स्पष्टपणे जाणवत होती. स्थानिकांच्या मते, काही नाल्यांमधून येणारे दूषित सांडपाणी आणि रासायनिक घटकांमुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, नदीतील फेस ही केवळ सौंदर्यहानी नसून पाण्यातील रासायनिक बदलांची गंभीर चिन्हे असू शकतात. याचा थेट परिणाम जलजीवनावर होत असून मासे आणि इतर जलचरांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे.
नदीपात्रात व्यावसायिकांचा कचरा
प्रत्यक्ष पाहणीत काही ठिकाणी व्यावसायिकांकडून टाकण्यात आलेला प्लास्टिक, थर्माकोल, काचा आणि इतर घनकचरा नदीपात्रात आढळून आला. काही कचरा पाण्यावर तरंगताना दिसत होता, तर, काही किनाऱ्यावर साचलेला होता. विशेष म्हणजे, हा कचरा न कुजणारा असल्याने तो दीर्घकाळ नदीतच राहून पर्यावरणाला हानी पोहोचवत आहे. पावसाळ्यात हा कचरा वाहून जाऊन नदीचा प्रवाह अडवण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाणीउपशामुळे नदीवर वाढता ताण
काही भागात मोटरच्या सहाय्याने नदीतून थेट पाणीउपसा केला जात असल्याचेही निदर्शनास आले. आधीच प्रदूषण आणि अतिक्रमणाच्या दबावाखाली असलेल्या नदीवर पाण्याच्या अनियंत्रित उपशामुळे अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी होत गेल्यास भविष्यात पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
उपाययोजना
नदीपात्रातील कचरा तत्काळ हटवणे
जलपर्णीची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे
नदीत मिसळणाऱ्या नाल्यांची तपासणी करणे
पाणीउपशावर नियंत्रण
नदीकाठांवर नियमित गस्त आणि दंडात्मक कारवाई
प्रदूषण करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई
कोट्यवधी खर्च; पण परिणाम कुठे ?
नदीसंवर्धन, नदीस्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया आणि पर्यावरण संरक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे असल्याचे चित्र दिसत आहे. नदीकाठावर कचरा, फेसाळलेले पाणी आणि जलपर्णीचे ढीग पाहता प्रशासनाच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. फक्त बैठका, घोषणा आणि कागदोपत्री मोहीम न राबवता प्रत्यक्षात ठोस कृती कधी होणार ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
नद्यांची होत असलेली दुर्दशा ही केवळ प्रशासनाची नाही, तर समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे. नदी हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलाच नसल्यामुळे तिची अशी अवस्था झाली आहे. नद्या साफ करण्यापेक्षा त्या प्रदूषित होणार नाहीत यावर भर दिला पाहिजे. एसटीपी, ईटीपी सोबतच नदीकाठावरील अतिक्रमण आणि नदीसुधारणा प्रकल्पांच्या नावाखाली होणारे काँक्रीटीकरण थांबणे गरजेचे आहे. इच्छाशक्ती आणि योग्य नियोजन असेल तर नद्या स्वच्छ ठेवणे अशक्य नाही.
प्रशांत राउळ, ग्रीन आर्मी
नदी स्वच्छतेसाठी निधी खर्च होतो, मग नदीची अवस्था दिवसेंदिवस अधिक वाईट का होत आहे?गावाकडून आलेली मित्र मंडळी आता नदीवर फेरफटका मारायलादेखील नकार देत आहेत. कारण नदी आता नाला वाटू लागली आहे.
मनीष कोकाटे, स्थानिक
नदीकाठावरील अनेक भागात असह्य दुर्गंधी पसरली होती. स्थानिक नागरिकांच्या मते, विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत नदीकाठाजवळ उभे राहणेही कठीण होत आहे. पूर्वी नदीकाठावर नागरिक फिरायला यायचे, आता दुर्गंधीमुळे त्या भागाकडे फिरकतही नाहीत.
महेश भालेराव, स्थानिक नागरिक
संबंधित भागांची पाहणी करून आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. तसेच, महापालिका, पर्यावरण विभाग आणि इतर यंत्रणांच्या समन्वयातून स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
शांताराम माने, आरोग्य विभागीय अधिकारी, ड क्षेत्रीय कार्यालय