पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह मानधन व कंत्राटी पद्धतीने कामगार काम करतात. त्यांना दिवाळीपूर्वी मासिक वेतन व बोनस अदा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तरीही अनेक कंत्राटदार बोनस देण्यास टाळटाळ करत आहेत. त्यामुळे बोनसविना आमची दिवाळी गोड कशी होईल, असा प्रश्न कंत्राटी कामगारांकडून उपस्थित केला जात आहे. (Latest Pimpri chinchwad News)
सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी सणानिमित्त महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येतो. त्यानुसार बोनस कायदा 1965 च्या अधीन राहून महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी तत्त्वावर व मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील बोनस दिवाळीपूर्वी अदा करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मानधन आणि कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांची दिवाळी उत्साहात व आनंदी व्हावी, या उद्देशाने हे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, महापालिकेतील बहुतेक कंत्राटदारांनी कामगारांना बोनस अदा केलेला नाही. कोणत्याही विभागाने आजअखेर कामगार कल्याण विभागाकडे बोनस दिल्याचा अहवाल सादर केलेला नाही. महापालिकेत दहा हजारांपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी आहेत. यासह सुरक्षारक्षक तसेच, पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युतविषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी आणि वैद्यकीय विभागात कंत्राटी कर्मचारी नेमलेले आहेत. कंत्राटदारांकडून पुरेसे वेतनदेखील अदा केले जात नाही. त्यात दिवाळी बोनस न देता कामगारांना आनंद हिरावून घेण्याचे काम कंत्राटदार करीत आहेत. तो तातडीने देण्याची मागणी होत आहे.
सर्व विभागप्रमुखांनी कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल कामगार कल्याण विभागास सादर करावा. तसेच, बोनस अदा करण्याची कार्यवाही न करणाऱ्या संबंधित विभागप्रमुख किंवा कंत्राटदार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कामगार कल्याण विभागाने म्हटले होते.
सर्व विभागातील कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस अदा करणे आवश्यक आहे. ज्यांनी बोनस अदा केला आहे. तसेच, ज्या कंत्राटदारांनी बोनस दिलेला नाही. त्याबाबत अहवाल कामगार कल्याण विभागाला जमा झालेला नाही. बोनस दिलेला नसल्यास संबंधित कंत्राटदारांची बिले थांबविण्याची कारवाई केली जाईल, असे महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी प्रमोद जगताप यांनी सांगितले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार ठेकेदारांनी बोनस दिवाळीपूर्वी देण्याचे आदेश काढण्यात आले. पण, प्रत्यक्षात दिवाळी काही दिवसांवर आली असताना ठेकेदारांनी अद्याप बोनस दिलेला नाही. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस न संबंधित विभागाच्या महापालिका अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर प्रतिकात्मक पध्दतीने काळी दिवाळी साजरी करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते नीलेश हाके यांनी दिला आहे.