Illegal Hoardings Removal Pudhari
पिंपरी चिंचवड

Illegal Hoardings Removal: पालखी मार्गावरील ७० अनधिकृत होर्डिंग्ज हटवले; पीएमआरडीएची कारवाई सुरू

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी हवेली-दौंड-पुरंदर मार्गावर विशेष मोहीम

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाने पालखी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 70 अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात आली असून, पालखी मार्ग मोठ्या प्रमाणात होर्डिंग्जमुक्त करण्यात आला आहे.

वारकर्‍यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि अडथळामुक्त व्हावा, या उद्देशाने आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी मे महिन्यातच पालखी मार्गांचे सर्वेक्षण करून अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, अनधिकृत बांधकाम विभागाने हवेली, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गांवरील सुमारे 123 होर्डिंग्जची तपासणी केली.

सह आयुक्त हिम्मत खराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदेशीर परवानगी नसलेली 70 होर्डिंग्ज निष्कासित करण्यात आली. यामध्ये हवेली-सोलापूर मार्गावरील 32, दौंड व पुरंदारमधील प्रत्येकी 13 आणि वडकी परिसरातील 12 होर्डिंग्जचा समावेश आहे. काही होर्डिंगधारकांनी प्रशासनाच्या सूचनेनंतर स्वतःहूनही होर्डिंग्ज काढून घेतली.

दरम्यान, पीएमआरडीएच्या हद्दीतील इतर प्रमुख रस्ते आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील होर्डिंग्जचे सर्वेक्षणही सुरू असून, विनापरवाना किंवा अनधिकृत होर्डिंग्ज आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. संबंधित व्यावसायिकांनी आवश्यक परवानग्या घेऊनच होर्डिंग्ज उभारावीत, अन्यथा थेट निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT