पिंपरी: पुणे महानगर प्रदेशातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि रेल्वे फाटकांमुळे निर्माण होणार्या अडचणी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या करारामुळे रेल्वे उड्डाणपूल आणि रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्ग यांच्या बांधकामाला गती मिळणार असून, प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन रेल्वे फाटकमुक्तीचा विशेष उपक्रम हाती घेतला होता. रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, पादचारी पूल (एफओबी) आणि भुयारी मार्ग यांची कामे विविध यंत्रणांमार्फत करण्याऐवजी रेल्वे प्रकल्पांचा अनुभव असलेल्या महारेलमार्फत राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
वेळ, इंधनाची होणार बचत
त्याअनुषंगाने पीएमआरडीए आणि महारेल यांच्यात अनेक बैठका झाल्यानंतर सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांनी करारावर स्वाक्षर्या केल्या. या वेळी दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या करारामुळे पुणे महानगर प्रदेशातील अनेक रेल्वे फाटकांवरील वाहतूक अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. रेल्वे फाटकांमुळे वाहनांच्या लागणार्या लांबच लांब रांगा कमी होतील, प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होईल आणि नागरिकांना अधिक सुरक्षित व वेगवान वाहतुकीचा लाभ मिळेल. तसेच, प्रदेशाच्या पायाभूत विकासाला चालना मिळून आर्थिक आणि नागरी विकासाचा वेगही वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भूसंपादन रखडल्याने रिंगरोडला विलंब
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या अंतर्गत रिंगरोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम अपेक्षेपेक्षा संथ गतीने सुरू असून, भूसंपादन प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने प्रकल्पाला विलंब होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या सोलू इंटरचेंज ते वडगाव शिंदे या सुमारे 4.70 किलोमीटर लांबीच्या मार्गाची आखणी करण्यात आली आहे. संबंधित खासगी जमिनींचे मूल्यांकन पूर्ण झाले असले तरी काही भूखंडांच्या संपादनाची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याने प्रत्यक्ष कामाला वेग मिळू शकलेला नाही.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बाह्य रिंगरोडशी हा अंतर्गत रिंगरोड सोलू परिसरात जोडला जाणार आहे. जिल्ह्याच्या प्रादेशिक आराखड्यात सुरुवातीला 90 मीटर रुंदीचा प्रस्तावित असलेला हा रस्ता पुढे 110 मीटर करण्यात आला होता. त्यानंतर 2021 मध्ये तो 65 मीटर रुंदीचा करण्यात आला आणि 2023 मध्ये अवघड वळणे टाळून सुधारित आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एकूण सुमारे 83 किलोमीटर लांबीच्या या रिंगरोडचे पाच टप्प्यांत बांधकाम होणार आहे. मात्र, पुढील काही टप्प्यांना गावकर्यांचा विरोध असल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या प्रगतीवर परिणाम होत आहे.
वाहतूककोंडी होणार कमी
दरम्यान, आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष कामाला गती मिळेल, असा विश्वास अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर लोहेगाव, विमानतळ परिसर, आयटी पार्क तसेच पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार असून, चर्होली ते वाघोली दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.