पिंपरी: जिल्ह्यातील होर्डिंग आणि जाहिरातीच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी तसेच, परवानगी देण्यासाठी पीएमआरडीएमध्ये आकाशचिन्हे विभाग स्थापन करण्यात येणार आहे. यापूर्वी त्यासंबंधित धोरण पीएमआरडीएने जाहीर केले होते. त्यात बदल करून नव्याने आता हा विभाग काम करणार आहे. त्य संबंधित सूचना पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई
या स्वतंत्र विभागामुळे होर्डिंग आणि आकाशचिन्हे परवानगी प्रक्रियेत सुसूत्रता येईल, एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळतील आणि प्राधिकरणाच्या महसुलातही भरीव वाढ होण्यास मदत होईल, असे पीएमआरडीएने सांगितले आहे. दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत यापुढे कोणत्याही परिस्थितीत विनापरवानगी होर्डिंग्ज लावू दिली जाणार नसल्याचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी सांगितले. ज्यांच्याकडे परवानगी नाही, त्यांनी तत्काळ अर्ज करावेत; अन्यथा अनधिकृत होर्डिंग्ज हटवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा दिला आहे.
या संबंधित आकुर्डी येथे कार्यालयात नुकतीच जिल्हाभरातील होर्डिंग व्यावसायिकांची बैठक पार पडली. यात होर्डिंगधारक संघटनांचे पदाधिकारी, व्यावसायिक यांच्यासह पीएमआरडीएच्या विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील उपस्थित होते. पुणे महानगराचे विद्रूपीकरण आणि अनधिकृत होर्डिंग्जच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पीएमआरडीएने आता कंबर कसली आहे. ज्या व्यावसायिकांना चलने जारी झाली आहेत, त्यांनी तातडीने चलनांचा भरणा करून आपली होर्डिंग्ज अधिकृत करून घ्यावीत, असे आवाहनही महानगर आयुक्तांनी केले आहे.
अधिकृत होर्डिंगवर क्यूआर
पीएमआरडीएअंतर्गत अधिकृत होर्डिंगवर क्यूआर कोड आणि परवाना क्रमांक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत आता सर्व्हेक्षणदेखील करण्यात येणार आहे. तसेच, होर्डिंगच्या परवानगीसाठी पीएमआरडीएने नव्याने विकसित केलेल्या ऑनलाइन प्रणालीचे प्रात्यक्षिक या बैठकीत दाखविण्यात आले.
यवत-राहू मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध विकासकामे सुरू असतानाच यवत-राहू (राज्य मार्ग 119) दरम्यान रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. या उभारणीच्या कामाला वेग आला असून, या कामाची संबंधित बैठक नुकतीच पार पडली. या पुलाचे काम महारेल मार्फत केले जाणार असून, लवकरच या कामासाठी सामंजस्य करार केला जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीला महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैस्वाल, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, महारेलचे महाव्यवस्थापक मुदसर भट, उदयकुमार कीर्ती, दिलीप काशीद, हर्षवर्धन इंगवले, आशिष धर्माधिकारी उपस्थित होते. पीएमआरडीए आणि महारेल यांच्यातील या महत्त्वाच्या बैठकीत यवत-राहू रेल्वे उड्डाण पुलाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. पुणे महानगर क्षेत्रातील रस्ते रेल्वे फाटकमुक्त करण्याच्यादृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे. लवकरच या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात येणार असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे, अशी माहिती आयुक्त अभिजित चौधरी यांनी दिली.