पिंपरी: पीएमआरडीएअंतर्गत हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पाऊल उचलण्यात आले असून, आकुर्डी येथील मुख्यालयात विभाग प्रमुखांसह नुकतीच बैठक झाली. या बैठकीला हिंजवडी, वाघोली येथील नागरिकांनीदेखील उपस्थित राहून सूचना मांडल्या. 5 डिसेंबरपूर्वी खड्डेविरहित रस्ते करण्याच्या सूचना देत विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहे.
मेट्रो लाईन 3 खालील रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरून डांबरीकरण करावे, हिंजवडी परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पीएमआऱडीए निधी देणार असून, पुणे - मुंबई बाह्यवळण मार्गावर विविध ठिकाणी अंडरपास तसेच राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्ते बांधणे, शिक्रापूर व वाघोली येथील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ते बांधण्याचे नियोजनदेखील बैठकीत स्पष्ट केले.
हिंजवडी येथील नवीन प्रस्तावित रस्त्याबाबत 18 प्रस्ताव दाखल झालेले असून, त्यापैकी तीन रस्त्यांची मोजणी पूर्ण झालेली असल्याचे सांगितले. खड्ड्यांमुळे जीवितहानी झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात येईल, अशी गंभीर सूचना केली.
या बैठकीला पोलिस उपायुक्त (वाहतूक) सारंग आव्हाड, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, भूसंपादन समन्वयन अधिकारी कल्याण पांढरे, महापालिकेचे सह-शहर अभियंता बापू गायकवाड, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला, प्रादेशिक अधिकारी अर्चना पाठारे, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तुषार दहागावकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.
पुणे - कोलाड राष्ट्रीय महामार्गाच्या भूगाव गावठाण येथील वाहतूक कोंडीबाबत रस्त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील आठवड्यामध्ये कंत्राटदारास कार्यादेश देण्यात येत आहेत.
वाघोली ते शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करायच्या दृष्टीने पुणे - अहिल्यानगर मार्गास समांतर 30 मीटर रस्ते नियोजन (आरपी) नकाशानुसार खराडी जकात नाका ते केसनंद ते बकोरी रस्ता हा वाघोली बायपास रस्ता असून, रस्त्याचे सीमांकनाचे काम पीएमआरडीएकडून पूर्ण केले आहे. वाघोली व केसनंद परिसरातील वाहतूककोंडी कमी करून खराडीपासून केसनंद चौक बायपास करून पुणे - अहिल्यानगर मार्गावरील लोणीकंदपर्यंतच्या नवीन वाघोली, केसनंद बायपास रस्त्याच्या नवीन मार्गाबाबत प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्तावित करण्यात यावा, जेणेकरून वाघोली व केसनंद या परिसराला नवीन बायपास रस्ता उपलब्ध होईल, असेही महानगर आयुक्तांनी निर्देशित केले.