पिंपरी: निगडीतील यमुनानगर भागात महावितरण कंपनीकडून भूमिगत विद्युत केबल टाकण्यासाठी रस्ते खोदकाम करण्यात येत आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलवाहिनी फुटली. हा प्रकार सोमवारी (दि.1) घडला. त्यानंतर पाणीपुरवठा विभाग तसेच, महावितरण कंपनीकडे तक्रार करूनही दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
अखेर, एका सामाजिक कार्यकर्त्याने धरणेआंदोलन केल्याने जागे झालेल्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारी (दि. 3) दुपारी साडेबाराला दुरुस्तीकाम पूर्ण केले. या तीन दिवसांत लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा विभागाने दुरुस्ती कामास टाळाटाळ केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
यमुनानगर परिसरात महावितरण कंपनीकडून भूमिगत विद्युत केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ते खोदण्यात येत आहेत. रस्ते खोदकाम करताना महापालिकेची जलवाहिनी सोमवारी (दि. 1) दुपारी फुटली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बाबा परब यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली. पाणी वाया जात असून, तातडीने दुरूस्ती करण्याची विनंती केली. मात्र, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तिकडे फिरकले नाहीत. मंगळवारी (दि. 2) सकाळी दहाला केवळ मलमपट्टी करण्यात आली. मात्र, रात्री पुन्हा मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. त्यानंतरही तक्रार करून पाणीपुरवठा विभागाने प्रतिसाद दिला नाही.
तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि. 3) पाण्याची नासाडी कायम असल्याने संतापलेले बाबा परब यांनी सकाळी 8.30 ला घटनास्थळी धरणे आंदोलन सुरू केले. जोपर्यंत योग्य प्रकारे दुरूस्ती केली जात नाही, तोपर्यत तेथून न हटण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तब्बल तीन तासांनंतर म्हणजे सकाळी 11.30 ला घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी लाजेखातर दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यानंतर पाण्याची नासाडी पूर्णपणे थांबली.
जलवाहिनी फुटल्याने गेल्या तीन दिवसात लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. त्यामुळे त्या परिसरात पुरेसा प्रमाणात पाणी न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ऐन उन्हाळ्यात शहरातील अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पवना धरणात पाणी कमी असल्याचे उत्तर देऊन अधिकारी व कर्मचारी जबाबदारी झटकत आहेत. मात्र, पाणी गळती दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा प्रकारावरून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, महावितरण कंपनीकडून खोदकाम करताना जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वर्षभरात सुमारे तीन वेळा घडले आहेत.
दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
कोणतीही परवानगी नसताना महावितरण कंपनीकडून विद्युत केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात येत आहेत. संबंधित ठेकेदाराकडे खोदकामासाठी कोणताही परवाना नव्हता. बेजबाबदारपणे खोदकाम केले जात असताना जलवाहिनी फुटली. त्याकडे पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष नव्हते. तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आले. तीन दिवसानंतर दुरुस्ती काम करण्यात आले. पिण्याचे पाणी वाया गेल्याने त्याची नुकसान भरपाई महावितरण कंपनीकडून वसूल करण्यात यावी. तसेच, दुरुस्तीस टाळाटाळ करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबा परब यांनी केली आहे.
महावितरण कंपनीला पाठवले समजपत्र
महावितरण कंपनीकडून खोदकाम सुरू आहे. त्यात जलवाहिनी फुटली आहे. त्यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. त्याबाबत महावितरण कंपनीला पत्र पाठवून समज दिली आहे. जलवाहिनी फुटल्याचे समजताच तातडीने दुरुस्ती काम करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.