पिंपरी: पहिल्याच अवकाळी पावसाने शहरातील नागरिक तसेच, वाहनचालकांची धांदल उडाली. महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या खोदकामामुळे अनेक रस्ते चिखलमय झाले होते. पावसाळ्यापूर्वीची साफसफाई न झाल्याने रस्त्यावर पाणी साचल्याने तसेच, वीज खंडित होऊन सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्याने अनेक भागांत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
काही भागांतील जाहिरात होर्डिंगवरील फ्लेक्स फाटून हवेत उडत होते. शहरातील या घटनेतून महापालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारी केली नसल्यासे उघड झाले आहे. अवकाळी पावसाने सोमवारी (दि. 30) दुपारी अचानक हजेरी लावली.
मेघगर्जनेसह गारांनी शहराला झोडून काढले. सुमारे तास-दोन तास झालेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली. अचानक हजेरी लावल्याने नागरिक पावसात अडकून पडले. काही भागांत झाड्यांच्या फांदा पडल्या. त्यातच शहरातील अनेक परिसरातील वीज गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
रस्त्यांवरील चेंबरची झाकणे, दुभाजकांच्या बाजूचे उघडी गटारांची साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचले होते. त्यात वीज गेल्याने सिग्नल यंत्रणा बंद पडली. परिणामी, अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती. ऐन पावसात वाहनचालकांना कोंडीत अडकून पडावे लागले. दुचाकीस्वारांना नाईलास्तव पावसात भिंजत प्रवास करावा लागला.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून निगडी ते दापोडी मार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर खोदकाम करून भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन येथे संपूर्ण रस्ता चिखलाने माखला होता. चिंचवड स्टेशन येथेही चिखल निर्माण झाला होता. त्यामुळे वाहने घसरुन पडण्याचे प्रकार घडले.