पिंपरी: उन्हाळी सूट्यांमध्ये गावी जाणार्या प्रवाशांची शहरातील ट्रॅव्हल्स चालकांकडून दुपटीने भाडे आकारून आर्थिक लूट होत आहे. पुणे ते नागपूर प्रवासाचे इतर वेळेसचे तिकीट दीड हजार ते सोळाशे रूपये या दरम्यान आहे; मात्र सध्या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून दोन ते अडीच हजार रुपये दर आकारला जात आहे; तसेच शनिवारी आणि रविवारी दरात आणखी वाढ केली जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रोजीरोटीसाठी रोजगार आणि शिक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळी सुट्ट्यामध्ये कुटूंबासह बरेचजण गावाकडे जातात. एकाच वेळी गर्दी वाढत असल्याने रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले असून, एसटीचे तिकीट देखील लवकर मिळत नाही.
त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स या परिस्थितीचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा दर आकारत आहेत. तसेच शहरातील आरटीओचे दुर्लक्ष असल्याने या चालकांची मनमानी सुरू असल्याने सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत असल्याचे दिसून येत आहे.
या खासगी ट्रॅव्हल्स चालकांवर नियंत्रण ठेवण्याचे काम शहर प्रादेशिक विभागाच्या वतीने होणे अपेक्षित आहे; मात्र याविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. आरटीओच्या दुर्लक्षामुळे राज्यासह परराज्यातील प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहे. याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, प्रवाशांकडून जादा दर आकारणाऱ्या संबंधित ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात येते, असे सांगण्यात आले.
आठवड्याच्या शेवटी दरात मोठी वाढ
सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असल्याने ट्रॅव्हल्सच्या दरातही वाढ झाली आहे. शनिवार तसेच रविवारी दरात जादा वाढ केली जाते. शनिवार तसेच रविवारी गावी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने दरातही वाढ करण्यात येते.