पिंपरी: चिंचवड येथील एम्पायर इस्टेट हाऊसिंग सोसायटी येथे मागील काही दिवसांत मोकाट श्वानांनी 4 ते 5 जणांना चावा घेतल्याचे प्रकार घडले आहेत. त्यासंदर्भात तक्रार करण्यासाठी तेथील संतप्त नागरिक महापौर रवी लांडगे यांच्याकडे आले होते. महापौरांनी तक्रार मांडल्यानंतर त्यांच्या दालनातून बाहेर पडल्यानंतर तक्रारदार आणि प्राणीप्रेमी यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला जाऊन तो थेट हाणामारीपर्यंत पोहचला. त्या राड्याची महापालिका वर्तुळात खमंग चर्चा होती.
एम्पायर इस्टेट सोसायटी परिसरात अनेक मोकाट व भटके श्वान आहेत. या श्वानांनी तेथील 4 ते 5 जणांना चावा घेतल्याच्या घटना काही दिवसांमध्ये घडल्या. त्या श्वानांवर नियंत्रण आणून त्याचा बंदोबस्त करण्याची तक्रार करण्यासाठी तेथील संतप्त नागरिक महापौर लांडगे यांच्याकडे शुक्रवार (दि. 24) तक्रार घेऊन आले होते.
दुपारी बाराच्या सुमारात महापौर लांडगे यांनी त्या नागरिकांशी चर्चा केली. त्यांची तक्रार ऐकून घेतली. तक्रारीची दखल घेत, महापौरांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्या नागरिकांसोबत काही प्राणिप्रेमी नागरिकही उपस्थित होते. महापौरांनी दोन्हीकडील बाजू ऐकून घेऊन कार्यवाही करण्याबाबत त्यांना ग्वाही दिली.
त्यानंतर ते सर्व नागरिक महापौर दालनातून बाहेर पडले. तिसऱ्या मजल्याच्या आवारात आले असता, तक्रारदार आणि प्राणीप्रेमी यांच्यात शाब्दीक वाद झाला. एकमेकांवर आरोप करत ते थेट एकमेकांना भिडले. ते हाणामारीपर्यंत पोहचला. गोंधळ ऐकून नेते महापालिकेचे सुरक्षारक्षक दाखल झाले. त्यांनी नागरिकांना शांत करत महापालिका भवनाचा रस्ता दाखवला. श्वानांवरून झालेल्या या भांडणाची चर्चा महापालिका वर्तुळात दिवसभर होती.
श्वानाबाबतच्या तक्रारींनाही वेळ द्यावा लागतो
मोकाट व भटक्या श्वानांकडून चाव्या घेण्याचा घटना शहरात वारंवार घडत आहेत. त्या हल्ल्यात बालक, ज्येष्ठ नागरिक व महिला जखमी होत आहेत. त्यावरून महापालिका सर्वसाधारण सभेत राडाही झाला होता. मोकाट श्वानांची संख्या आटोक्यात आणण्याची मागणी सभागृहात करण्यात आली होती. असे असले तरी, ते प्रकार काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे श्वानांच्या त्रासाबाबतचे नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्याची वेळ अधिकाऱ्यांसह महापौरांसह पदाधिकाऱ्यांवर आली आहे. त्यात अधिक वेळ गेल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली.