Pimpri Chinchwad Senior Citizens Safety: ज्येष्ठ नागरिक छळावर कडक कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलिसांचा इशारा

तक्रार आली की थेट गुन्हा; ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम
Senior Citizens Safety
Senior Citizens SafetyPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांना कडक कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील सर्व ज्येष्ठ नागरिकांची यादी अद्ययावत करण्यात येत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी थेट संपर्क मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Senior Citizens Safety
Pimpri Smart City Company Closed: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी बंद; राज्य शासनाचे आदेश

ज्येष्ठ नागरिकांकडून मुलगा किंवा कुटुंबीयांकडून मानसिक, शारीरिक अथवा आर्थिक छळ होत असल्याची तक्रार प्राप्त होताच संबंधितांवर विलंब न करता गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा तक्रारींना घरगुती बाब म्हणून दुर्लक्षित न करता कायदेशीर पातळीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याने गैरवर्तन करणाऱ्यांवर कायद्याचा प्रभावी चाप बसणार आहे.

पोलिस ठाणे स्तरावर ज्येष्ठ नागरिकांची स्वतंत्र नोंद ठेवून बीट मार्शल, पोलिस कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या माध्यमातून दरमहा प्रत्यक्ष भेटी घेतल्या जाणार आहेत. या भेटीदरम्यान आरोग्य, घरगुती तणाव, आर्थिक फसवणूक किंवा इतर अडचणींबाबत माहिती घेऊन तात्काळ मदत दिली जाणार आहे. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

Senior Citizens Safety
Pimpri Power Outage Crane Incident: तळवड्यात क्रेन रोहित्रावर कोसळली; 8,600 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वयंसेवकांच्या समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि रहिवासी संघटनांचा यात सहभाग राहणार असून, सुरक्षित परिसर ही संकल्पना राबविण्यावर भर दिला जाणार आहे. यासोबतच घरकाम करणाऱ्या व्यक्तींची पार्श्वभूमी पडताळणी अधिक काटेकोर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध घडणाऱ्या घटनांचा स्वतंत्र अहवाल तयार करून दरमहा वरिष्ठांकडे सादर केला जाणार असून, नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी विविध माध्यमांतून माहिती प्रसारित केली जाणार आहे. या उपाययोजनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Senior Citizens Safety
Talegaon Water Supply Summer Demand: तळेगाव दाभाडेत पाण्याची मागणी वाढली; नागरिकांना जपून वापराचे आवाहन

संवादातून सुरक्षितता

ज्येष्ठ नागरिकांशी थेट संपर्क ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. बीट मार्शल व पोलिस कर्मचारी दरमहा प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतील. संभाव्य धोके ओळखून वेळेत मदत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

तक्रार आली की थेट गुन्हा

ज्येष्ठ नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा छळ झाल्याची तक्रार प्राप्त होताच संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल केला जाणार आहे. उपेक्षा किंवा छळ हा कायद्याने दखलपात्र गुन्हा असून, अशा प्रकरणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

काय सांगतो कायदा?

ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल व कल्याण अधिनियम 2007 नुसार ज्येष्ठ नागरिकांना बेवारस सोडणे, त्यांची उपेक्षा करणे किंवा त्यांच्यावर मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक छळ करणे हा गुन्हा आहे. दोषी आढळल्यास कारावास तसेच, दंडाची तरतूद आहे.

घरकाम करणाऱ्यांची पडताळणी का गरजेची?

शहरात घडलेल्या काही गुन्ह्यांमध्ये घरकामगारांचा सहभाग आढळून आल्याने त्यांच्या ओळखपत्रांची आणि पार्श्वभूमीची पडताळणी करणे आवश्यक ठरते. योग्य पडताळणीमुळे चोरी, फसवणूक किंवा घरगुती गुन्हे रोखण्यास मदत होते.

Senior Citizens Safety
PCMC PMPML Metro Feeder Bus: पीसीएमसी मेट्रो ते काळेवाडी फाटा फिडर बस सुरू; 10-20 रुपयांत प्रवास

कुटुंबीयांसाठी इशारा

आई-वडिलांप्रती जबाबदारी न पाळणे किंवा त्यांना मानसिक, शारीरिक अथवा आर्थिक त्रास देणे गंभीर गुन्हा मानला जाणार आहे. अशा प्रकरणांत घरगुती बाब म्हणून दुर्लक्ष न करता थेट कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याने कुटुंबीयांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

  • अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देताना दक्षता बाळगावी

  • आर्थिक व्यवहार करताना पडताळणी करावी

  • शेजाऱ्यांशी संपर्क ठेवून आपत्कालीन मदतीची व्यवस्था ठेवावी

  • संशयास्पद घटना घडल्यास त्वरित पोलिसांना कळवावे

तक्रार कशी कराल?

ज्येष्ठ नागरिकांना जवळच्या पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदवता येते. तसेच, बीट मार्शलमार्फत किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधूनही माहिती देता येते.

ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता आणि सन्मान अबाधित राखणे हे पोलिस प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. कुटुंबीयांकडून मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक छळ झाल्यास अशा प्रकरणांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. संबंधितांविरुद्ध कोणतीही तडजोड न करता तत्काळ गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news