Pimpri Traffic Congestion Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Traffic Congestion: पिंपरीतील शगुन चौक सिग्नल बंद; वाहतूक कोंडी वाढली

बाजारपेठेतील गर्दीमुळे वाहनांच्या लांब रांगा; सिग्नल दुरुस्तीची प्रतीक्षा, वाहनचालक हैराण

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: पिंपरी शहरातील वाहतूक नियंत्रित करण्याच्या उद्देशाने शगुन चौकात बसवलेली सिग्नल यंत्रणा बरेच दिवस झाले बंद आहे. या वर्दळीच्या ठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. झुलेलाल मेन बाजाराच्या मध्यवर्ती भागात शगुन चौकातील सिग्नल बंद असल्यामुळे शगुन चौक ते साई चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होते. काल पाडवा आणि शनिवारी असलेल्या ईदमुळे पिंपरी बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा वाहनचालकांना सामना करावा लागला.

पिंपरी शहरातील डिलक्स चौक, राष्ट्रसंत गाडगेबाबा चौक, रिव्हर रोड, साई चौकातील रस्ते गर्दीने गजबजून गेले आहेत. दुसरीकडे रस्त्यावरील वाहनांची संख्याही वाढली आहे. पुणे, मुंबई, महामार्गावरील वाहने शगुन चौकातून पिंपरी, काळेवाडी, रहाटणी उपनगर रस्त्यावर जातात म्हणून वाहनांची संख्या वाढत चालली असून, पिंपरी बाजारपेठेत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सिग्नलची आवश्यकता आहे; परंतु ही सिग्नल यंत्रणा गेले कित्येक दिवस झाले बंद आहे, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

रस्त्यावर वाहन पार्किंग

पिंपरी शहरातून जाणाऱ्या काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, पिपरीगाव, पिंपळे सौदागर या मार्गांवर वाहनांची जास्त वर्दळ आहे. उपनगरांतील बहुतांश रस्ते पिंपरी बाजारपेठेत येऊन मिळतात. जवळच्या काही अंतरावर पिंपरी रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन असल्याने प्रवासी जवळच्या जवळ रस्त्यावर वाहने पार्किंग करतात. त्यामुळे येथील वाहतुकीची समस्या वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. शगुन चौकाबरोबरच पिंपरी मेट्रोस्टेशनपासून पिंपरीत जाणार्ऱ्या मार्गावरदेखील दोन्ही बाजूने वाहने पार्क केल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

वाहतूक जनजागृतीची गरज

वाहतूक नियमाबाबत जनजागृती करण्यात येत असली, तरी नागरिक मात्र शहाणे झाल्याचे दिसत नाही. भरधाव वाहन चालवणे, चौकातून चुकीच्या पद्धतीने गाडी चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, सिग्नल सुरू असला तरी रस्त्यावर थांबायचे नाही, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावायची कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाच्या या कारभारामुळे चौकातील वाहतूक मात्र अनियंत्रित झाली आहे. सिग्नलच्या दुरुस्तीची कार्यवाही अद्याप झाली नसल्याने प्रशासन याबाबतीत किती गंभीर आहे, हे स्पष्ट होत आहे.
हेमंत दुबळे, दुचाकीचालक
येत्या काही दिवसांत शगुन चौकातून पुढे बिजचे काम सुरू होणार असल्यामुळे ती सिग्नल यंत्रणा कायमची काढून टाकण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा बसविणे सोयीस्कर नाही. तशी सूचना लवकरच देण्यात येणार आहे.
अमित डोळस, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, पिंपरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT