पिंपरी: शहरातील नद्या आधीच प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या असताना आता नदीकाठ परिसर कचरा जाळण्याचे केंद्र बनत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन दिवसांमध्ये प्रशासनाची नजर असल्याने कचरा जाळण्याचे प्रकार तुलनेने कमी दिसतात; मात्र रविवारी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी अज्ञात व्यक्ती तसेच काही व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
प्रशासन सुटीवर, प्रदूषण मात्र ड्युटीवर
रविवारी सकाळपासूनच नदीकाठ, मोकळे भूखंड आणि काही झुडपी भागांतून धुराचे लोट उठताना दिसतात. प्लास्टिक, थर्माकोल, रबर आणि विविध प्रकारचा घनकचरा जाळला जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरते. अनेक ठिकाणी हा धूर थेट रहिवासी वस्त्या आणि शाळांच्या परिसरात पोहोचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदी संवर्धनासाठी कोट्यवधींच्या योजना राबविल्या जात असताना दुसरीकडे नदीकाठावरच कचरा टाकणे आणि नंतर तो जाळून पुरावे नष्ट करण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे नदी स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक त्रस्त
कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारा विषारी धूर शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांसाठी धोकादायक ठरत आहे. रविवारी सुटी असल्याने अधिक वेळ घराबाहेर असणाऱ्या नागरिकांना या धुराचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक
स्थानिकांच्या मते, कार्यालयीन वेळेत कारवाईची भीती असल्याने संबंधित घटक सुटीच्या दिवशीच सक्रिय होतात. यामुळे प्रशासनाच्या तपासणी यंत्रणेला जाणीवपूर्वक चकवा दिला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कचरा जाळण्याचे प्रकार नियमितपणे होत असतानाही दोषींवर कारवाई झाल्याची उदाहरणे फारशी दिसत नाहीत.
सुटीच्या दिवशी विशेष पथक तैनात करण्याची मागणी
नदी स्वच्छतेसाठी मोहीम, पर्यावरण संवर्धनाचे संदेश आणि प्रदूषण नियंत्रणाचे दावे केले जातात; मग रविवारी नदीकाठावर पेटणाऱ्या कचऱ्याच्या चितांकडे नेमके कोणाचे लक्ष आहे? प्रशासनाने सुटीच्या दिवशी विशेष पथके तैनात करून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
फोनही उचलला नाही, मग तक्रार करायची कुणाकडे?
रविवारी नदीकाठ परिसरात कचरा जाळल्याच्या प्रकाराबाबत पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. प्रदूषणासारख्या गंभीर विषयावर संबंधित विभागाशी संपर्क होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
रविवारीच पेटतात कचऱ्याचे ढीग
कार्यालये बंद, तपासणी कमी
नदीकाठ आणि मोकळ्या जागांवर हालचाली वाढतात
कचरा जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
धुरामुळे रहिवासी, उद्याने, मंदिर व शाळा परिसर प्रभावित
प्रशासनाच्या देखरेखीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह
दररोज सायंकाळी परिसरात धुराचे लोट दिसू लागतात. प्लास्टिक जाळल्याचा तीव्र वासही येतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास होतो. प्रशासनाने केवळ स्वच्छतेच्या घोषणा न करता प्रत्यक्ष कारवाई करावी.गौरव मोरे, स्थानिक रहिवासी