Drowning  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri River Drowning: पिंपरीत पवना व इंद्रायणी नदीत बुडून तिघांचा मृत्यू; परिसरात हळहळ

मावळ व देहूगाव परिसरात घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तीन जणांचा बळी; पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पवना आणि इंद्रायणी नदीत वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला असून, इंद्रायणी नदीत आणखी दोघांचा बळी गेला आहे. या घटना शनिवारी (दि. 30) आणि रविवारी (दि. 31) मावळ व देहूगाव परिसरात घडल्या.

अरमान कुमार (21, रा. झारखंड) असे पवना नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरमान कुमार हा त्याचे मित्र दीपक कुमार (रा. झारखंड) आणि रमाकांत दरवा (रा. ओडिशा) यांच्यासमवेत मावळ तालुक्यातील बेबडओहळ येथे पवना नदीत पोहण्यासाठी गेला होता. तिघेही नदीत पोहत असताना अरमान आणि दीपक हे दोघे पाण्यात बुडू लागले. त्यावेळी रमाकांत याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात दीपक याला वाचविण्यात यश आले.

मात्र, अरमान हा पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण केले. बचाव पथकांनी शनिवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविली. मात्र, अरमान याचा शोध लागला नाही.

त्यानंतर शोधकार्य थांबविण्यात आले. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. सकाळी आठच्या सुमारास अरमान याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, रविवारी इंद्रायणी नदीत बुडून आणखी दोघांचा मृत्यू झाला. यातील एक घटना देहूगाव येथील गाथा मंदिराजवळ तर, दुसरी घटना कुंडमळा परिसरात घडली. दोन्ही मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व घटनांचा तपास स्थानिक पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT