Property Tax  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Property Tax Recovery: पिंपरीत मालमत्ता कर वसुलीसाठी आक्रमक मोहीम; थकबाकीदारांची नावे जाहीर

622 कोटींची थकबाकी; 80 जप्त मालमत्तांच्या लिलावाची तयारी, अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 13 दिवस बाकी असतानाच महापालिकेच्या कर संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी जोरदार कारवाई मोहिम सुरू केली आहे. कर वसुलीसाठी आत्तापर्यंत जप्ती मोहीम, नळजोड तोडण्यात येत आहेत. आता प्रत्येक झोनमधील मोठे थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी आपल्या नावाची बदनामी टाळण्यासाठी अभय योजनेचा लाभ घेऊन बिल भरावे, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

शहरातील 5 लाख 60 हजार 473 मालमत्ताधारकांनी 817 कोटी 43 लाख रूपयांचा भरणा केला आहे. चालू आर्थिक वर्षात विभागाने 1 हजार कोटी रुपयांचे उदिष्ट ठेवले आहे. शहरातील एक लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कम असलेल्या थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यास सुरूवात केली आहे.

यामध्ये निवासी तसेच, दुकानदार, व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, हॉटेलचालक, उद्योजक, बँक, पतसंस्था, मोकळ्या जमिनींचे मालक, विविध संस्था आदी थकबाकीदार मालमत्ताधारकांची नावे आहेत. बदनामी होण्यापूर्वी थकबाकीदारांनी बिलाचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, थकित बिल भरण्यासाठी नागरिकांना मदत होण्यासाठी अधिकचे कॅश काऊंटर वाढविले आहेत. त्याची वेळ सुद्धा वाढविण्यात आली आहे.

दोन लाख मालमत्ताधारकांकडे 622 कोटी थकीत

शहरातील अद्याप 2 लाख 3 हजार 772 मालमत्ताधारकांनी बिल भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्या मालमत्ताधारकांकडे तब्बल 622 कोटी 42 लाख रूपयांची थकबाकी आहे. या मालमत्ताधारकांना शेवटची संधी म्हणून विलंब शुल्कावर 90 टक्के दंड माफीची अभय योजना लागू करण्यात आली आहे. त्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तब्बल 80 जप्त मालमत्तांचा लिलाव करणार

गेल्या काही वर्षांपासून मालमत्ताकर न भरलेल्या मिळकतधारकांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. कर संकलन विभागाने आत्तापर्यंत 80 पेक्षा जास्त मालमत्ता जप्त केल्या आहेत. मालमत्ता जप्तीनंतरही कर न भरणाऱ्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे कर संकलन विभागाचे नियोजन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT