

पिंपरी: बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या वाढीव कामात मोठ्या प्रमाणात भष्टाचार होत असल्याचा आरोप करत संबंधित ठेका तात्काळ रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग््रेास व शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) नगरसेवकांनी केली आहे. वाढीव व चुकीच्या दराने दिलेल्या निविदेविरोधात नगरसेवकांनी महापालिका भवनासमोर बुधवारी (दि. 18) आंदोलन केले. ठेका रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे.
आंदोलनात विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक संदीप वाघेरे, शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे, पंकज भालेकर, शेखर चिंचवडे, यश साने, विराज लांडे, संतोष कोकणे, सागर कोकणे, नगरसेविका सुलभा उबाळे, संगीता ताम्हाणे, दिप्ती कांबळे, संगिता ताम्हाणे, उज्वला ढोरे, सविता आसवानी, निकिता कदम, रेश्मा कातळे, वर्षा जगताप, प्रियांका कुदळे यांनी सहभाग घेतला होता. स्मारकाच्या कामात पारदर्शकता नसून निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत धनेश्वर कॅन्स्ट्रक्शन हा ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का?, महापालिका एवढी मेहेरबान का?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
सुलभा उबाळे यांनी सांगितले, की सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवून त्याची जागा बदलल्यामुळे कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यावेळी 5 कोटींची निविदा थेट देण्यात आली होती. जुन्या आणि नव्या ठिकाणी एकच ठेकेदार कसा, त्याला वाढीव दराने निविदा देण्याचा उद्देश काय आहे. नाना काटे यांनी सांगितले, की स्मारकाची निविदा फुगवून भष्टाचार झाला आहे. सर्वांनी विरोध करूनही ही निविदा मंजूर करण्यात आली. ही निविदा रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव आंदोलन करू. संदीप वाघेरे यांनी सांगितले, की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने होणाऱ्या कामात भष्टाचार होत असल्याचे पाहून संताप येतो.
अधिकाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. मग वाढीव निधी देऊन ही उधळपट्टी कशासाठी. बोगस ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने चुकीची कामे केली जात आहेत. दरम्यान, संबंधित ठेका तात्काळ रद्द करून संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी
पुतळ्यासाठी चुकीचा जागा निवडल्याने 14 कोटी 40 लाख 18 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. धनेश्वर कॅन्स्टक्शन या कंपनीला पुतळा उभारणीचा कोणताही पूर्व अनुभव नसताना त्यांना कंत्राट देण्यात आले. प्रत्यक्षात पुतळा तयार करण्याचे काम शिल्पकार राम सुतार यांनी केले आहे. मात्र, त्यांना बिल अदायगी धनेश्वर कंपनीमार्फत करण्यात आली. नियमानुसार, पुतळ्याच्या कामासाठी स्वतंत्र निविदा काढणे आवश्यक होते. मुख्य कंत्राटदाराला केवळ कमिशन एजंट म्हणून वापरणे ही निविदा प्रक्रियेची फसवणूक आहे. दुसऱ्या टप्प्यात 15 कोटी 11 लाख 54 हजार 781 रुपयांच्या मूळ निविदेमध्ये 5 कोटी 41 लाख रुपयांचा 35.79 टक्के अधिक खर्च मंजूर करण्यात आला. इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ करणे हे बेकायदेशीर आहे. टप्पा दोनच्या कामात 60 टक्क्यांपेक्षा जास्त कामे ही विद्युतची आहेत. त्यांचा समावेश स्थापत्य कामाच्या निविदेत करण्यात आला आहे. सीपीडब्ल्यूडी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांनुसार, विद्युत कामांची स्वतंत्र निविदा न काढता दोन्ही कामे एकत्रित केल्यामुळे विद्युत क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्या स्पर्धेतून बाहेर राहिल्याने महापालिकेस आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. या सर्व आर्थिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.