

पिंपरी: महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत शहरात मालमत्ताकर वसुलीची मोहीम तीव करण्यात आली आहे. नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच, शहरातील 18 विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सुटीच्या दिवशीही मालमत्ताकर भरता येणार आहे. नागरिकांनी मालमत्ताकराचे बिल भरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.
या महिन्यात गुरूवारी (दि.19) गुढीपाडवा तसेच, 26 मार्चला श्रीराम नवमीनिमित्त सुटी आहे. त्या दिवशीही सर्व विभागीय कर संकलन कार्यालये नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत सर्व कार्यालयांतील कॅश काऊंटर सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.45 या वेळेत सुरू राहणार आहेत. यामुळे कामकाजाच्या दिवशी वेळ काढणे शक्य नसलेल्या नागरिकांनाही सुटीच्या दिवशी बिल भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेही कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यालयात जाऊन किंवा महापालिकेच्या लािलळपवळर.र्सेीं.ळप या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन माध्यमातून कर भरता येतो.
सवलतीचा लाभ घेण्यास केवळ 15 दिवस शिल्लक
महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे 15 दिवस शिल्लक राहिले आहेत. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ताकर एकरक्कमी भरल्यास विलंब दंडावर तब्बल 90 टक्के सवलत दिली जात आहे. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी 806 कोटी 78 लाखांचा भरणा केला आहे. या योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, 1 ते 14 मार्चपर्यंत 17 हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ती योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत 51 कोटी 11 लाख रुपयांचा कर भरणा झाला आहे. त्यात थकबाकीदारांना तब्बल 13 कोटींची सवलत देण्यात आली आहे, असे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
थकबाकीदाराच्या नावांची यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध
एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या निवासी व बिगरनिवासी थकबाकीदारांच्या नावांची यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे थकबाकी कोण कोण आहे, ते सर्व शहराला समजत आहे. त्यात बांधकाम व्यावसायिक, हॉटेल, मॉल, व्यावसायिक, दुकानदार, शैक्षणिक संस्था, रुग्णालय आदींचा समावेश आहे. मित्रमंडळी व नातेवाईकांकडून त्याबाबत विचारणा होत आहे. नागरिकांनी आपली बदनामी टाळण्यासाठी थकबाकीसह संपूर्ण मालमत्ताकर भरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
मालमत्ताकर न भरल्यास नळजोड खंडित
नागरिकांना मालमत्ताकर भरण्यासाठी सुटीच्या दिवशीही सर्व कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला मालमत्ताकर वेळेत भरून महापालिकेला सहकार्य करावे अन्यथा नळजोड खंडित तसेच, जप्तीची कारवाई केली जाईल, असे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.