Property Tax Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Property Tax Collection: पिंपरी-चिंचवडमध्ये 860 कोटींची मालमत्ताकर वसुली; अभय योजनेची मुदत अखेरच्या टप्प्यात

31 मार्चपर्यंत थकबाकी भरल्यास 90% दंडमाफी; कर न भरल्यास जप्तीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2025 ते 24 मार्च 2026 या कालावधीत 860 कोटी 59 लाख रुपयांचा मालमत्ताकर वसूल केला आहे. कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर रवी लांडगे यांनी सर्व करदात्यांचे आभार मानले असून, ज्या थकबाकीदार नागरिकांनी अद्याप कर भरलेला नाही त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन तात्काळ कर भरणा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अभय योजनेत 31 मार्चपर्यंत थकीत मालमत्ताकराची रक्कम एकरकमी भरल्यास विलंब दंडावर तब्बल 90 टक्के सवलत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहे.

शहरात सध्या निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर मिळून सुमारे 7 लाख 32 हजार मालमत्तांची नोंद आहे. त्यापैकी 5 लाख 72 हजार 902 मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, अशा थकबाकीदारांवर जप्ती तसेच, नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

वाकड विभागीय कार्यालयाकडून सर्वात जास्त वसुली

कर संकलन विभागाची 1 एप्रिल 2025 पासून ते 23 मार्च 2026 या कालावधीत वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली झाली आहे. या कालावधीत या कार्यालयाने 106 कोटी 12 लाख रुपयांची वसुली केली आहे. थेरगाव 87 कोटी 49 लाख, चिखली कार्यालयाने 74 कोटी 10 लाख, किवळे 59 कोटी 86 लाख, भोसरी 56 कोटी 34 लाख,कस्पटे वस्ती 55 कोटी 86 लाख, मोशी 55 कोटी 45 लाख, चिंचवड 54 कोटी 19 लाख, पिंपरी गाव 47 कोटी 60, सांगवी 42 कोटी 76 लाख, महापालिका भवन 38 कोटी 96 लाख, आकुर्डी 37 कोटी 90 लाख, चऱ्होली 34 कोटी 57 लाख, , फुगेवाडी दापोडी 33 कोटी 69 लाख, दिघी बोपखेल 25 कोटी 50 लाख, तळवडे 23 कोटी 35 लाख, निगडी प्राधिकरण 19 कोटी 23 लाख आणि पिंपरी कॅम्प कार्यालयाने 7 कोटी 62 लाख रुपये वसुल केले आहेत.

मालमत्ताकर न भरल्यास कठोर कारवाई

कर संकलन विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कामकाजामुळे व नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सुलभ सुविधांमुळे कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. अभय योजनेअंतर्गत दिली जाणारी 90 टक्के सवलत ही नागरिकांसाठी मोठी संधी असून, थकबाकीदारांनी या कालावधीत कर भरून दंडमाफीचा लाभ घ्यावा. कर न भरणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येत आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT