Property Tax  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Property Tax Bill Distribution: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकर बिले वाटप महिला बचत गटांकडे

प्रत्येक बिलासाठी 20 रुपये शुल्क; समितीने 1 कोटी 76 हजार रुपये खर्चास मान्यता

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मालमत्ताकराची बिले वाटपाचे काम महिला बचत गटांकडे देण्यात येत आहे. एका बिलासाठी गटास 20 रुपये शुल्क देण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 1 कोटी 76 हजार रुपये खर्चासह विविध कामांच्या खर्चास स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला आयुक्त श्रावण हर्डीकर, नगर सचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, समिती सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते. सभेपुढे एकूण 25 विषय होते. त्यापैकी छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात सुशोभिकरणाचे दोन विषय तहकूब करून उर्वरित विषयांना मान्यता देण्यात आली.

शहरातील 8 लाख निवासी व बिगरनिवासी मालमत्तांची महापालिकडे नोंदणी आहे. एक बिल तसेच, थकबाकीदारांना जप्ती नोटीस वाटपासाठी 20 रुपये शुल्क गटाच्या सदस्यास दिले जाते. त्यासाठी एकूण 1 कोटी 60 लाख रुपये खर्च आहे. ते कामकाज आर्थिक विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली चालत असल्याने मंडळास 10 टक्के म्हणजे 16 लाख रुपये रक्कम दिली जाणार आहेत. असे एकूण 1 कोटी 76 हजार रुपये खर्च त्यासाठी येणार आहे. त्या खर्चास समितीने मान्यता दिली आहे.

पाणीपुरवठा विभागाकडील शहरातील पाण्याची तसेच, नद्यांतील पाण्याची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी 21 लाख 6 हजार 621 रुपये खर्च आहे. घरकुलपासून जाधववाडी पंप हाऊसपर्यंत आवश्यकतेनुसार जलवाहिनी टाकणे. कुदळवाडी एसटीपी ते लक्ष्मी चौक देहू-आळंदी रस्त्यापर्यंत आवश्यकतेनुसार जलवाहिनी टाकणे. काळेवाडी परिसरातील दिव्यांच्या देखभाल व दुरुस्ती करणे. ब क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे. मोशी येथे दफनभूमत विद्युत विषयक 63 लाख 46 हजार 212 रुपये खर्चाचे काम करणे. यमुनानगर रुग्णालयात 28 लाख खर्चाचे जनित्र संच बसविणे. निगडी अमरधाम स्मशानभूमी येथे 40 लाख खर्चाचे जनित्र संच उभारणे. निगडी येथील भक्ती शक्ती समुह शिल्प चौकातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बस टर्मनिल येथे ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी 43 लाख रुपये खर्च करणे.

भामा-आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्र ते नवलाख उंबरे येथील बेक प्रेशर टाकीपर्यंत 1700 मिलीमीटर व्यासाची रायझिंग मेन (जलवाहिनी) टाकणे. नवलाख उंबरे ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 1400 मिलीमीटर व्यासाची गुरुत्व जलवाहिनी टाकण्यास अडथळा ठरणाऱ्या उच्चदाब विद्युत खांब व तारा स्थलांतरित करण्यास सुमारे 1 कोटी शुल्क आहे. सेक्टर क्रमांक 23 जलशुद्धीकरण केंद्राजवळील विज वितरण कंपनीची 22 के व्ही वाहिनी हटविण्यास 68 लाख रुपये शुल्क आहे. लिंक रोड चिंचवड ख्रिश्चन स्मशानभूमी, दापोडी, निगडी, दिघी मुस्लिम दफनभूमी, दिघी लिंगायत दफन भूमी येथील काळजीवाहक संस्थाना सहा महिने मुदतवाढ देणे आदी खर्चास समितीने मान्यता दिली.

महापालिका कार्यालय, शाळांच्या टाक्या सफाईसाठी 2 कोटी 25 लाख खर्च

महापालिका शाळा, कार्यालये, दवाखाने या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई आणि स्वच्छता केली जाणार आहे. त्यासाठी 3 पैकी 2 ठेकेदाराच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी राजलक्ष्मी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेची 2 कोटी 24 लाख 33 हजार खर्चाचा दर स्वीकृत करण्यात आला आहे. त्या खर्चास समितीने मान्यता दिली. त्यावर सुलभा उबाळे म्हणाल्या की, टाक्या स्वच्छ होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. तसेच, पाणी दूषित झाल्यास संबंधित विभागाने जबाबदारी घ्यावी. त्याबाबत संबंधित विभागाने लेखी द्यावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT