

पिंपरी: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) आपली पीएमपीएमएल या मोबाईल ॲपचा लाखो प्रवासी लाभ घेत आहेत. या मोबाईल ॲपवरुन प्रवाशांना बसच्या लाईव्ह लोकेशनबरोबर तिकीट आणि पास काढता येत आहे; परंतु ॲपद्वारे काढण्यात येणाऱ्या तिकिटासाठी, प्रवासाची वेळ निश्चित केल्यामुळे वेळेत प्रवास करावा लागत आहे. निश्चित वेळेनंतर तिकीट अवैध होते. मात्र, वाहतूक कोंडीमुळे निर्धारित वेळेत प्रवास पूर्ण न झाल्यास तिकीट अवैध ठरते. त्यामुळे प्रवाशांना ॲपची ही सुविधा आहे की मनस्ताप, असा प्रश्न पडत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह पीएमआरडीए हद्दीत पीएमपीकडून सेवा दिली जाते. मुंबईतील बेस्टच्या चलो धर्तीवर पुण्यातही आपली पीएमपीएल हे ॲप दोन वर्षांपूर्वीपासून प्रवाशांच्या सेवेत आणले. पुणे महानगर परिवहन महामडंळ (पीएमपी) ॲप सुरू झाल्यानतंर तीन दिवसांच्या कालावधीत 50 हजार नागरिकांनी ते डाऊनलोड केले. त्या तीन दिवसांत 6 हजार नागरिकांनी त्यावरुन तिकीट काढले होते.
गेल्या वर्षभरात आपली पीएमपीवरुन 4 कोटी 7 लाख 30 हजार 25 प्रवाशांनी पवरून तिकीट काढले आहे. तसेच, दिवसाला ॲपवरुन तिकीट 1 लाख 11 हजार 589 प्रवासी तिकीट काढत आहेत. या ॲपवरुन प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन समजत आहे. बस किती वेळेत थांब्यावर येणार याची माहिती मिळते. त्यानुसार, प्रवासी तिकीट काढून प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत; परंतु वेळेच्या मर्यादेमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रवाशांना दुहेरी फटका
पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळेत नागरिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे पीएमपीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीटावर असणाऱ्या वैध वेळेत प्रवास करणे शक्य होत नाही. अशा वेळी पवरून काढलेले तिकीट ठराविक वेळेनंतर अवैध होते. तसेच, बऱ्याच प्रवाशांना तिकिटाची वैधताच माहिती नसल्यामुळे तिकीट तपासणीसाने पडकल्यानतंर ते तिकीट अवैध असल्याचे सांगून दंड भरायला लावतात.
निर्धारित वेळेत प्रवास न केल्यास दंडात्मक कारवाई
ॲपवरून ऑनलाइन पध्दतीने पेमेंट करून तिकीट काढल्यानंतर त्यावर वेळ आणि तिकीट वैधता दाखविली जाते. निश्चित वेळेनंतर तिकीट अवैध ठरते. साधारण प्रवासाच्या अंतरानुसार अर्धा तास ते दोन तासांपर्यंत तिकिटाची वैधता देण्यात आली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ पीएमपी प्रशासनाने सुट्ट्या पैशांवर होणारा वाद मिटवण्यासाठी , ऑनलाइन तिकिटाची सुविधा सुरू केली आहे. या ऑनलाईन सुविधेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. प्रवाशांनी निश्चित वेळेत , प्रवास करणे बंधनकारक आहे. निश्चित वेळेत प्रवास न झाल्यास तिकीट ब्लिंग करते. त्यामुळे प्रवाशांनी निश्चित वेळेत प्रवास करावा.
यशवंत हिंगे वाहतूक व्यवस्थापक पुणे