बजरंग मासाळ
पिंपरी: विकासाच्या गगनचुंबी दाव्यांमध्ये पिंपरी-चिंचवडमधील पवनानदी मात्र दिवसेंदिवस मृतप्राय होत चालल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. रावेत, किवळे, चिंचवड, थेरगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी ते दापोडी परिसरापर्यंत केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत नदीकाठावर अतिक्रमण, राडारोडा, घनकचरा आणि केमिकलयुक्त पाण्यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र दिसून आले.
पवना नदी दापोडीजवळ मुळा नदीला मिळते. मात्र, या संपूर्ण पट्ट्यात अनेक ठिकाणी नदीपात्र आणि नदीकाठ अक्षरशः कचऱ्याच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. काही ठिकाणी नदीचे नैसर्गिक सौंदर्य पूर्णपणे नाहीसे झाले असून, नदीकाठावर दुर्गंधी, प्रदूषण आणि अस्वच्छतेचे सामाज्य निर्माण झाले आहे.
नदी वाचली तरच शहर वाचेल
पवना नदी ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, विकासाच्या नावाखाली तिचे अस्तित्वच संपवले जात असेल तर, भविष्यात त्याची मोठी किंमत शहराला मोजावी लागू शकते. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत. तर, पवना नदी केवळ नकाशावर उरण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
नदीपात्रात सुरू असलेले अतिक्रमण, कचरा टाकण्याचे प्रकार आणि प्रदूषण पाहता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नदीकाठांवर नियमित गस्त, सीसीटीव्ही निरीक्षण आणि कठोर दंडात्मक कारवाईचा अभाव असल्यानेच अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते नदीपात्रातील वाढते अतिक्रमण भविष्यात पूरस्थितीस कारणीभूत ठरू शकते. नदीचा प्रवाह अरुंद झाल्यास मुसळधार पावसात पाणी शहरात घुसण्याचा धोका वाढू शकतो.
नदीत तरंगतोय शहराचा कचरा
पवना नदीच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, थर्माकोल, कपडे, झाडांचा कचरा, बांधकामातील टाकाऊ साहित्य आणि इतर घनकचरा थेट नदीत टाकण्यात आल्याचे दिसले. काही ठिकाणी तर नदीच्या प्रवाहावरच कचऱ्याचे थर जमा झाले होते. पाण्यावर तरंगणारा हा कचरा केवळ नदीचे सौंदर्य नष्ट करत नाही. तर, पर्यावरणासाठीही गंभीर धोका निर्माण करत आहे. नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी दुर्गंधी आणि डासांच्या वाढत्या प्रमाणाबाबत नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यात परिस्थिती आणखी भयानक होते, असे स्थानिकांनी व्यक्त केले.फनदीकाठ कचऱ्यात विलीन
काही भागात नदीकाठ पूर्णपणे राडारोडा आणि कचऱ्याखाली गाडला गेल्याचे चित्र दिसले. नदी कुठे संपते आणि कचऱ्याचा ढीग कुठून सुरू होतो, हे ओळखणेही कठीण झाले होते. विशेष म्हणजे, नदी संवर्धन, नदी सुशोभीकरण आणि स्वच्छता मोहिमांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दावे होत असताना प्रत्यक्षात मात्र नदीची अवस्था अधिकच बिकट होत असल्याचे दिसून आले.फकेमिकलयुक्त पाण्याचा नदीत विसर्ग
औद्योगिक भागाजवळील काही नाल्यांमधून रंग बदललेले आणि फेसाळ पाणी थेट नदीत मिसळताना दिसले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही कंपन्यांकडून केमिकलयुक्त सांडपाणी नाल्यांद्वारे नदीत सोडले जात आहे. यामुळे नदीतील जलजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पूर्वी नदीत मासेमारी करणारे काही नागरिक आता नदीजवळ जाणेही टाळत असल्याचे दिसले. दूषित पाण्यामुळे त्वचारोग आणि दुर्गंधीच्या समस्या वाढत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली.
रात्रीतून भर टाकून नदीकाठ गिळंकृत
प्रत्यक्ष पाहणीत काही भागांत नदीकाठावर रात्री मुरूम, माती आणि बांधकामातील राडारोडा टाकून भराव करण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर या जागांवर पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत होते. स्थानिकांच्या मते, काही भागांत टप्प्याटप्प्याने नदीकाठ कमी केला जात आहे. सुरुवातीला राडारोडा टाकला जातो, नंतर ती जागा सपाट करून त्यावर तात्पुरती बांधकामे उभी केली जातात. विशेष म्हणजे, हे सर्व सुरू असताना संबंधित विभागांची कारवाई मात्र कुठेच दिसत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पूर्वी पवना नदीकाठावर नागरिक फिरायला यायचे. आता दुर्गंधीमुळे उभे राहणेही कठीण झाले आहे. प्रशासन फक्त घोषणा करते; पण प्रत्यक्ष काम दिसत नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देउन त्या विभागाने यावर योग्य ती कारवाई करून नद्यांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.सुरेश सकट, सामाजिक कार्यकर्ते , पिंपळे गुरव
पवना नदी परिसरात प्रदूषण आणि अतिक्रमणासंदर्भात प्रशासन गंभीर असून, संबंधित भागांची संयुक्त पाहणी केली जाणार आहे. या पट्ट्यात दोन मैलाशुद्धीकरण प्रकल्प कार्यरत आहेत आणि सांडपाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित निरीक्षण केले जाते. नदीपात्रात झालेली अतिक्रमणे, राडारोडा टाकणे तसेच कचरा टाकणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. औद्योगिक भागामधून नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचीही तपासणी केली जाणार असून, पर्यावरण विभाग, पालिका आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून नदी स्वच्छता आणि संवर्धनासाठी पुढील काळात विशेष मोहीम राबविण्यात येईलयोगेश आल्हाट, कार्यकारी अभियंता पर्यावरण विभाग