

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या 60 कोटी 18 लाख रुपयांच्या बोगस उपसूचना घोटाळा प्रकरणात अखेर राज्य शासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी नवी मुंबई महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी सत्यवान किशनराव उबाळे यांची वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या वित्त विभागाने शुक्रवारी (दि. 29) या संदर्भातील आदेश जारी केला आहे.
महापालिकेच्या सन 2025-26 च्या अर्थसंकल्पातील तरतुदीमध्ये बोगस उपसूचनांद्वारे वाढ व घट करत विशिष्ट ठेकेदारांना आर्थिक फायदा पोहोचवण्यात आला. तो घोटाळा स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी बाहेर काढला.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी या नात्याने प्रवीण जैन यांनी या नियमबाह्य कामाला आक्षेप घेणे अपेक्षित असताना त्यांनी ठेकेदारांच्या फायद्यासाठी ते बिले मंजूर करून घेण्यामध्ये मुख्य सूत्रधाराची भूमिका बजावली. अभिषेक बारणे यांनी त्यासंदर्भात तक्रार दाखल करत त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली.
ठेकेदारांशी संगनमत करण्याचा जैन यांच्यावर ठपका
महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचा आणि शासकीय नियमांना बगल देऊन ठेकेदारांशी संगनमत करण्याचा ठपका चौकशी समितीकडून जैन यांच्यावर ठेवण्यात आला. महापालिकेच्या आर्थिक शिस्तीचे रक्षण करण्याऐवजी भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचे स्पष्ट झाल्यामुळे वित्त मंत्रालयाने जैन यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेत मुख्य लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सत्यवान उबाळे यांची बदली पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्या पदावर करण्यात आली आहे. साठ कोटींच्या या प्रकरणानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण जबाबदारी उबाळे यांचेकडे असणार आहे.