पिंपरी: पिंपरी मेट्रो स्टेशनवरून मेट्रो साडेतीन वर्षापासून धावत आहे; मात्र स्टेशनच्या चौथ्या जिन्याचे काम अद्याप सुरूच आहे. कामाला सुरुवात होऊन एक वर्ष होत आले तरी, हे काम संपत नसल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, पिंपरीहून मोरवाडीच्या दिशेने जाणारी बीआरटी मार्ग अनेक महिन्यांपासून ठेवण्यात आला आहे. (Latest Pimpri chinchwad News)
पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो धावण्यास 6 मार्च 2022 ला सुरुवात झाली. सध्या पिंपरी मेट्रो स्टेशनवरून विक्रमी संख्येने प्रवासी ये-जा करत आहेत. महामेट्रोला पिंपरी स्टेशनमधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. या स्टेशनला जोडणाऱ्या कमला क्रॉस बिल्डिंगजवळ जिन्याचे काम कासव गतीने सुरू आहे. तब्बल अडीच ते तीन वर्षे त्या ठिकाणी केवळ खोदून ठेवण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी कचरा व घाण जमा झाली होती.
अखेर, नोव्हेंबर 2024 मध्ये कामास सुरुवात करण्यात आली. तेथे जिना, फिरते जिने व लिफ्ट बसविण्यात येत आहे. त्या ठिकाणाहून थेट स्टेशनवर ये-जा करता येणार आहे. एक वर्ष होत आले तरी, अद्याप काम सुरूच आहे. त्यामुळे तेथील पदपथ पूर्णपणे खराब झाला आहे. रस्त्यावर राडारोडा, खडी व इतर बांधकाम साहित्य पडून आहे. तसेच, बॅरिकेट्स लावण्याने रस्ता अरुंद झाला आहे.
त्या कामासाठी पिंपरीहून मोरवाडीच्या दिशेने जाणारा बीआरटी मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. त्यामुळे वाहनचालकांची व पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच, कमला क्रॉस बिल्डिंगमधील दुकानदार व व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या इमारतीच्या दर्शनी भागात जिन्याचे काम करण्यात आल्याने ये-जा करणे त्रासाचे होत आहे.
काम संपत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्बन स्ट्रीट डिजाईनचे काम त्या ठिकाणी करण्यात आलेले नाही. त्यामुळे तो भाग विद्रुप झाला आहे. तेथील खड्ड्यात वाहन अडकून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून परिसर स्वच्छ व सुशोभित करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कमला क्रॉस बिल्डिंग येथून मेट्रो स्टेशनवर ये-जा करता येणार
पिंपरी मेट्रो स्टेशनचा हा चौथा जिना पूर्ण झाल्यानंतर कमला क्रॉस बिल्डींगसमोरील पदपथावरून स्टेशनकडे ये-जा करणे प्रवाशांना सुलभ होणार आहे. नागरिकांना मोरवाडी चौकात रस्ता क्रॉस करण्याची गरज भासणार नाही. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून येणाऱ्या नागरिकांची या जिन्यामुळे सुविधा होणार आहे. त्यामुळे हा जिना लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
ग्रेडसेपरेटरमध्ये धोकादायक काम
पदपथ, सर्व्हिस रस्ता व ग्रेडसेपरेटरवरुन जिन्या उभारण्यात येत आहे. ग्रेडसेपरेटर मार्गावरून हा लोखंडी जिना बसविण्यात येत आहे. ते काम करताना सुरक्षेकडे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रेडसेपरेटरमधून वेगात ये-जा करणाऱ्या वाहनांवर जिना व इतर साहित्य पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे.