

पिंपरी: चिंचवडमध्ये पती व पत्नीच्या वादातून झालेल्या पतीच्या खुनाच्या पोलिस तपासात आणखी काही कारणे समोर येऊ लागली आहेत. पत्नीला असणारे दारूचे व्यसन, कर्ज घेणे या बाबीदेखील समोर आल्या आहेत. त्यानुसार, तपास सुरू आहे. तसेच, या कटात आणखी कोणाचा समावेश होता का, याचीदेखील तांत्रिकदृष्ट्या चौकशी सुरू केली आहे. संशयित आरोपी पत्नीची पोलिस कोठडी रविवारी संपणार आहे. (Latest Pimpri chinchwad News)
चिंचवडमध्ये शुक्रवार (दि. 24) पहाटेच्या सुमारास नकुल आनंदा भोईर (40) यांचा खून करण्यात आला. या प्रकरणी नकुल यांचे भाऊ तुषार आनंदा भोईर (43, रा. भक्ती अंबर सोसायटी, माणिक कॉलनी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, पत्नी चैताली हिला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुल हे पत्नीला दारू पिऊ नकोस; तसेच दुसऱ्या पुरुषांसोबत फिरत जाऊ नकोस आणि लोकांकडून कर्ज काढू नकोस, असे सांगत होते. मात्र, पत्नी ऐकत नसल्याने दोघांमध्ये वाद होत होते. या कारणांवरून हा प्रकार घडल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना काही औषधांची पाकिटे आणि दारूची बाटली सापडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला संशयावरून ताब्यात घेतले; मात्र चौकशीमध्ये खुनामध्ये त्याचा सहभाग आढळून न आल्याने त्याला सोडून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.