Eye Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Masulkar Eye Hospital: मासुळकर नेत्र रुग्णालयात रुग्णांची वाढती गर्दी; रेटिना व बुबुळ रोपण सुविधेची प्रतीक्षा

मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया सुरू; मात्र अत्याधुनिक उपचारांसाठी आवश्यक साधनांचा अभाव

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पाहता डोळ्यांच्या आजारांसाठी विशेष रुग्णालयाची आवश्यकता होती. त्यामुळे मार्च 2023 मध्ये मासुळकर कॉलनी पिंपरी येथे मासुळकर नेत्र रुग्णालय सुरू करण्यात आले. रुग्णालयात डोळ्यांवरील सर्व उपचार होत असले तरी अजून रेटिना आणि बुबुळ रोपणाचे उपचार होत नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांना बुबुळ रोपणासारख्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.

यापूर्वी वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र नेत्र विभाग होता. मात्र, वाढती रुग्णसंख्या पाहून मासुळकर रुग्णालय सुरू करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शंकरराव मासुळकर नेत्र रुग्णालयाने रुग्णांचा विश्वास संपादन केला असून, महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येत आहेत. सन 2023 पासून आतापर्यंत जवळपास पावणेदोन लाख रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत. दररोज किमान 350 रुग्ण तपासणीसाठी येतात. तर, सोमवार आणि बुधवारच्या दिवशी 450 ते 500 रुग्ण ओपीडीसाठी येतात. केवळ पिंपरी चिंचवड परिसरातून नाही तर राज्यासह देशभरातील ठिकठिकाणांहून हे रुग्ण येत आहेत. सोलापूर, बेळगाव, कर्नाटक, विदर्भातून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

...या होतात शस्त्रक्रिया

रुग्णालयात मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, डोळ्यांवर येणाऱ्या पडदा, डोळ्याला इजा झाल्यास, पापण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. सर्वाधिक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया येथे करण्यात आल्या आहेत. सतत मोबाइल आणि टीव्ही पाहण्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो. तसेच, डोळ्यांवर यामुळे ताण येत असल्यामुळे चष्म्याचे नंबर वाढणे आणि डोळे कोरडे होण्याची समस्या असणारे रुग्ण अधिक आहेत.

रेटिना शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साधनांची प्रतीक्षा

सध्या रेटिना शस्त्रक्रियेसाठी सर्जन उपलब्ध असले तरीही काही आवश्यक साधने उपलब्ध नसल्याने या शस्त्रक्रिया करणे शक्य होत नाहीत. ही साधने उपलब्ध होण्याची प्रतिक्षा आहे. यासाठी रुग्णालयाच्या वतीने पाठपुरावा केला जात असून, लवकरच सर्व साधने उपलब्ध होतील, असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बुबुळ रोपणासाठी कोटा रजिस्ट्रेशन लागते. त्याची नोंदणी सुरू आहे. अजून त्याचे पत्र मिळाले नाही. राज्य शासनाकडून त्याची प्रक्रिया होत असते. महापालिकेने त्याची सर्व प्रतिपूर्तता केली आहे. रेटिन शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साधने उपलब्ध नसल्याने ते करणे शक्य होत नाही.
डॉ. रुपाली महेशगौरी, विभागप्रमुख, मासुळकर नेत्र रुग्णालय, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT