पिंपरी: संक्रातीचा गोडवा वाढविण्यासाठी दरवर्षीप्रमाणे बाजारात रेडिमेड तिळगूळ उपलब्ध झाले आहेत. यामध्ये काटेरी हलवा आणि तिळाची वडी, लाडूंना मागणी वाढू लागली आहे. संक्रातीच्या सणाला तीळगुळाचे लाडू किंवा वड्या आवर्जून खाल्ल्या जातात.
तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. जे थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देतात. जानेवारी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रात यादिवशी तिळगूळ घ्या गोड गोड बोला असे म्हणून तिळगूळ देण्याची प्रथा आहे. बाजारात रंगीबेरंगी काटेरी हलव्याची लहान व मोठ्या आकारातील पाकिटे उपलब्ध आहेत. तसेच तिळ आणि शेंगदाण्यांपासून तयार केलेली चिक्की, लाडू, तिळाची वडी, लाडू आदी उपलब्ध झाले आहेत.
संक्रातीसाठी लागणारे विविध साहित्य, खाद्यपदार्थ तिळगुळ, सुगड बाजारात दाखल झाले आहेत. बाजारपेठांमध्ये ठिकठिकाणी तिळगुळाचे स्टॉल लागले असून 10 रूपये, 20 रूपये अशा दराने तिळगुळाची पाकिटे उपलब्ध आहेत.
संक्रातीला गूळपोळी, तिळपोळी केली जाते. तसेच भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीला तीळ लावले जातात. यासाठी दुकानामध्ये शेंगदाणे, गुळ, तीळ यांना मागणी वाढली आहे. तिळाचे फायदे अनेक आहेत, त्यामुळे हिवाळ्यात तिळाचा आहारात समावेश केला जातो आणि विशेषतः तीळ आणि गूळ यापासून केलेल्या वड्या किंवा लाडू आरोग्यासाठी पोषक आहेत. सणासुदीच्या निमित्ताने हे पदार्थ खाल्ले जातात.
तिळगूळ लाडू, चिक्कीला मागणी
काटेरी हलव्यापेक्षा तिळाच्या चिक्कीला, वड्यांना मागणी आहे. चवीला उत्तम असणारे तीळलाडू किंवा तिळाच्या वड्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात तिळगुळाच्या लाडू व चिक्कीला अधिक मागणी आहे.