

मिलिंद कांबळे
पिंपरी: महापालिकेची निवडणूक तब्बल 9 वर्षांनंतर होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांचे उमेदवार त्वेषाने प्रचारात उतरले आहेत. या निवडणुकीत शहरातील पाच आमदारांची राजकीय ताकद पणाला लागली आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघात पक्षाचे सर्वाधिक नगरसवेक निवडून आणण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्या निकालावरून त्यांचे भविष्यातील विधानसभा निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.
शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. चिंचवड व भोसरीत भाजपाचे आमदार असून, पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तसेच, विधान परिषदेचे भाजपाचे दोन आमदार आहेत. असे एकूण 5 आमदार शहरात आहेत. तर, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रत्येकी एक खासदार आहे. आमदार तसेच, खासदारांकडून आपल्या प्रभाव क्षेत्रात पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत.
आपआपल्या विधानसभा मतदारसंघात त्यांनी शिफारस केलेल्याच इच्छुकांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आता त्यांचा प्रचार करण्यासाठी आमदार तसेच, खासदार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आपला अनुभवाच्या जोरावर प्रत्येक प्रभागात निवडणूक यंत्रणा राबवली जात आहे. तसेच, प्रत्येक पॅनलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या खास व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व नियोजन करून प्रभावी प्रचार यंत्रणा राबविण्यावर भर देण्यात आला आहे. प्रभागातील दररोजचा अहवालावर विचारमंथन करून ते दुसऱ्या दिवशीचे आखाडे ठरवत आहे. त्यानुसार, प्रचाराची रणनीती निश्चित केली जात आहे. प्रभागातील लोकवस्ती तसेच, मतदारवर्ग लक्षात घेऊन प्रचाराचे मुद्दे उपस्थित केले जात आहे. तसेच, त्या समाजाचे नेतृत्व करणारे नेते, खासदार व आमदार तसेच, पदाधिकाऱ्यांचे सभा, मेळावे व बैठकांचे आयोजन केले जात आहे.
तीनचे होणार पाच विधानसभा मतदारसंघ
देशातील लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार असल्याचे केंद्र सरकार आणि भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यापूर्वी 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली होती. दर 25 वर्षांनी मतदारसंघाची पुनर्रचना होणे अपेक्षित आहे. प्रत्येकी एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असतात. पिंपरी-चिंचवड शहरात दाट लोकवस्ती वाढत असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, मतदार संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मतदार संख्या लक्षात घेतल्यास शहरात तीनचे पाच विधानसभा मतदारसंघ तयार होऊ शकतात. लोकसभा मतदारसंघ हा सरासरी 15 ते 18 लाख मतदार संख्येचा असतो. तर, विधानसभा मतदारसंघ सरासरी 3 लाख मतदारांचा असतो. पुनर्रचनेनुसार येत्या 2029 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका नव्या मतदारसंघात होईल. विधानसभा मतदारसंघ वाढल्याने अनेकांना आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने काही ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक तयारीला लागले आहेत. आपल्यासह आजूबाजूचेही पॅनल विजयी करण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. तशी व्यूहरचना करण्यात आली असून, प्रचार यंत्रणेसह आवश्यक आर्थिक बळही पुरवले जात आहे. समर्थक नगरसेवक विजयी झाल्यास भविष्यातील आमदारकीची निवडणूक सोपी जाईल, असे गणित ते जुळवत आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे, अमित गोरखेंमध्ये टक्कर
पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा एससीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. त्यांची ही तिसरी टर्म आहे. ते विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे हा निवडणूक रिंगणात असून, आपले नशीब आजमावत आहे. तसेच, विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका अनुराधा गोरखे या निवडणूक लढवत आहेत. हा मतदारसंघात महापालिकेचे 10,14,15,20,21 आणि 30 असे एकूण 6 प्रभाग आहेत. एकूण 24 नगरसेवक संख्या आहे. तर, 3 लाख 99 हजार 811 मतदार आहेत. मतदारसंघात सर्वांधिक झोपडपट्ट्या असून, मध्यवर्गीय व उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर आहे. या मतदारसंघातील भाजपाचा सुप्रिया चांदगुडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात मोठी फोडाफोड करण्यात आली आहे. आपआपल्या पक्षाचे सर्वांधिक नगरसेवक करण्यासाठी दोन्ही आमदार प्रयत्न करीत आहेत. मतदारसंघातील काही प्रभागात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची सभा झाली आहे. तर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपाचे प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे. सर्वांधिक नगरसेवक विजयी करून भाजपा हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी आसुसलेला आहे. तर, राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. आ. अण्णा बनसोडे आपला छुपा करिश्मा दाखवणार की, अमित गोरखे त्यावर मात करणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात शंकर जगतापांची प्रतिष्ठा पणाला
भाजपाचे आमदार शंकर जगताप या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची ही पहिली टर्म आहे. यापूर्वी दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप व अश्विनी जगताप यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. शंकर जगताप हे महापालिका निवडणुकीचे भाजपाचे निवडणूक प्रमुख आहेत. तसेच, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांचा मतदारसंघात येतात. राज्यातील सर्वांत मोठा विधानसभा मतदार संघापैकी चिंचवड हा एक मतदारसंघ आहे. मतदारसंघात तब्बल 6 लाख 76 हजार 638 मतदार आहेत. हाऊसिंग सोसायट्या, रो हाऊस, अनधिकृत बांधकामे, बैठी घरे असे दाट लोकवस्तीचा हा मतदारसंघ आहे. मतदारसंघात उच्चभ्रू, उच्च शिक्षित, मध्यवर्गीय व कामगारवर्ग आहे. झपाट्याने विकसित झालेला हा मतदार संघ आहे. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी फोडत भाजपात प्रवेश दिला आहे. त्यातील अनेकांना उमेदवारीही देण्यात आली आहे. या मतदार संघात 16,17,18,19, 22, 23, 24, 25, 26, 27, 28,29,31 आणि 32 असे एकूण 14 प्रभाग असून सर्वांधिक 56 नगरसेवक आहेत. भाजपाचे सर्वांधिक नगरसेवक विजयी करून मतदारसंघ सेफ करण्यावर शंकर जगताप यांचा भर आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसही पूर्ण ताकदीने जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. भाजपाचे तसेच, इतर पक्षाचे काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला असून, काहींना उमेदवारीही देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या सभाही या मतदार संघात तब्बल चार सभा घेतल्या आहेत. राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेत प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. आ. शंकर जगताप भाजपाच्या जागा राखण्यात यश मिळते का, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर, याच मतदार संघातील थेरगाव भागात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांचा मुलगा विश्वजित बारणे आणि पुतण्या माजी नगरसेवक नीलेश बारणे हे दोघे निवडणूक मैदानात आहेत. त्यांच्या विजयासाठी खा. बारणे स्वत: प्रचार यंत्रणा हाताळत आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघात महेश लांडगे विरुद्ध अजित पवार सामना
भाजपाचे आमदार महेश लांडगे भोसरी विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची ही तिसरी टर्म आहे. एमआयडीसीतील कारखाने, लघुउद्योग, समाविष्ट गावे, रेडझोन हद्दीतील भाग, अनधिकृत बांधकामे असा दाट लोकवस्तीचा हा भोसरी मतदारसंघ आहे. समाविष्ट गावात मोठ्या प्रमाणात हाऊसिंग सोसायट्या उभ्या राहत आहेत. मतदारसंघात 6 लाख 24 हजार 152 मतदार आहेत. मतदारसंघात महापालिकेचे 1,2,3,4,5,6,7,8,9,11,12 आणि 13 असे एकूण 12 प्रभाग आहेत. तर, एकूण 48 नगरसेवक संख्या आहे. मतदारसंघात भाजपाच्या नगरसेवकांनी संख्या अधिक आहे. सर्वांधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी आ. महेश लांडगे यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक माजी नगरसेवक फोडत त्यांना भाजपाकडून तिकीट देण्यात आले आहे. विजयासाठी उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या मतदारसंघात भाजपाचे रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आले आहेत. मतदानापूर्वीच विजय झाल्याने उर्वरित उमेदवारांचा जोश वाढला आहे. भोसरी मतदारसंघावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले आहे. मतदार संघातील चिखली व तळवडे येथे प्रचाराची सुरुवात करत अजित पवारांनी थेट आ. महेश लांडगे यांना टार्गेट केले आहे. तीन जाहीर सभा घेत लांडगे यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांच्या आरोपांना आ. महेश लांडगे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यावरून महेश लांडगे विरुद्ध अजित पवार असा सामना रंगलेला दिसत आहे. या अटीतटीच्या लढाईत कोणता दादा जिंकणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.