पिंपळे गुरव: शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत राजकीय फ्लेक्सबाजी दिवसेंदिवस भीषण स्वरूप धारण करत असून, शहराचे सौंदर्य वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिथे जागा दिसेल तिथे फ्लेक्स पोस्टर्स अशी अक्षरशः स्पर्धा लागल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. सिग्नलचे खांब, वीजखांब दिशादर्शक फलक बीआरटीएस थांबे, अशा कोणत्याही सार्वजनिक जागा फ्लेक्सच्या विळख्यातून सुटलेल्या नाहीत.
पिंपळे गुरव येथील कल्पतरू बीआरटीएस थांब्यावर मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले असून, वाऱ्याच्या जोरामुळे हे फ्लेक्स उडत राहतात. त्यामुळे वाहतूक अडथळे निर्माण होतात, तसेच अपघाताचा धोका वाढला आहे. 80 टू 80 गार्डन ते नाशिक फाटा उड्डाण पुलापर्यंत विद्युत खांबांवर लावलेले छोटे कटआउट फ्लेक्सही कधीही रस्त्यावर पडून अपघातास कारणीभूत ठरू शकतात, असे चित्र पाहायला मिळत आहे.
स्थानिक नागरिकांनी या वाढत्या फ्लेक्सबाजीविरोधात तीव नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील वाढती फ्लेक्सची संख्या हा मुद्दा राहिलेला नसून, तो थेट लोकांच्या सुरक्षिततेशी निगडित गंभीर प्रश्न बनला आहे. यातील विशेष बाब म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आयुक्त यांनी अनधिकृत फ्लेक्सवर कारवाईचे आदेश वारंवार दिल्यानंतरही प्रत्यक्ष परिस्थितीत कोणताही बदल दिसून येत नाही.
विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार स्वतःच नियमांच्या विरोधात फ्लेक्स लावत असल्याने प्रशासनाची अंमलबजावणी व्यवस्था तोकडी पडत आहे. अनेक चौकांतील सिग्नल आणि दिशादर्शकफलक पूर्णपणे झाकले जात असल्याने वाहतुकीत गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर थेट परिणाम होत आहे. नागरिकांची ठाम मागणी आहे की, महापालिकेने केवळ कागदोपत्री मोहीम न राबवता प्रत्यक्षात गस्त वाढवावी; नियमाचा भंग करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी.
सातत्याने कारवाईची गरज
शहराचे सौंदर्य पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षा जपण्यासाठी अनधिकृत फ्लेक्सबाजीविरोधात कठोर सातत्यपूर्ण आणि प्रभावी मोहीम राबविण्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नागरिकांसह प्रशासनानेही तितक्याच गांभीर्याने पार पाडावी, असा सूर शहरभर उमटत आहे.
इलेक्शनमुळे शहरात विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. महापालिकेचे सर्व कर्मचारी मतदानाच्या कामात असल्याने क्षेत्रीय कार्यालयाची यंत्रणा उपलब्ध होऊ शकत नाही. तरी आवश्यक ती कारवाई पुढील दोन दिवसांत करण्यात येईल.कालिदास शेळके, आकाशचिन्ह परवाना विभाग