Gun Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Illegal Gun Trade: मुलीच्या उपचारासाठी कर्ज फेडण्यासाठी गुन्हेगाराचा पिस्तूल विक्रीचा धंदा; भोसरीत अटक

येरवडा कारागृहात ओळख झालेल्या शस्त्र पुरवठादाराकडून पिस्तुले आणून पुण्यात विक्रीचा प्रयत्न; गुंडा विरोधी पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मुलीच्या उपचारासाठी झालेले मोठे कर्ज फेडण्यासाठी एका सराईत गुन्हेगाराने थेट पिस्तूल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याची ओळख मध्य प्रदेशातील शस्त्र पुरवठादाराशी झाली होती. त्याच संपर्कातून तीन गावठी पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे आणून पुणे जिल्ह्यात विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या या गुन्हेगाराला पहिल्याच प्रयत्नात गुंडा विरोधी पथकाने रंगेहात अटक केली.

शब्बीर उर्फ मलीक जहाँगीर शेख (३८, रा. कर्वेनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह मध्य प्रदेशातील शस्त्र पुरवठादार पप्पी सिंग याच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस शिपाई शुभम कदम यांनी फिर्याद दिली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्बीर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर २०१२ पासून वारजे पोलीस ठाण्यात १४ आणि उत्तमनगर पोलीस ठाण्यात एक असे एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्या मुलीच्या जठराला गंभीर दुखापत झाली होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करताना मोठा खर्च झाल्याने तो कर्जबाजारी झाला.

दरम्यान, २०२३ मध्ये एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. तेथे त्याची बेकायदेशीर शस्त्रविक्री करणाऱ्या एका आरोपीशी ओळख झाली. त्या आरोपीने त्याला मध्य प्रदेशातील कुख्यात शस्त्र पुरवठादार पप्पी सिंग याचा संपर्क क्रमांक दिला. गरज भासल्यास व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधण्याचा सल्लाही त्याने दिला.

जेलमधून सुटल्यानंतर शब्बीरने रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. मात्र, उत्पन्न अपुरे पडत असल्याने आणि कर्जाचा बोजा वाढल्याने झटपट पैसा कमावण्यासाठी त्याने शस्त्र विक्रीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. एक जून रोजी त्याने पप्पी सिंगशी संपर्क साधला. पिस्तुले खरेदी करण्यासाठी कर्वेनगर येथील एका व्यक्तीकडून ४० हजार रुपये व्याजाने घेतले. स्वतःकडील पैशांसह तो दुचाकीवरून नाशिक, धुळे मार्गे शिरपूर येथे पोहोचला.

पप्पी सिंगने पाठविलेल्या लोकेशनवर गेल्यानंतर नंबर नसलेल्या दुचाकीवर आलेल्या एका तरुणाने चेहरा झाकून शब्बीरकडून ७५ हजार रुपये घेतले. त्याबदल्यात तीन गावठी पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे त्याच्या ताब्यात दिली. हा शस्त्रसाठा घेऊन शब्बीर पुण्यात परतला.

दरम्यान, गुरुवारी (दि. २५) सायंकाळी चारच्या सुमारास तो भोसरीतील गावजत्रा मैदान परिसरात ग्राहकाच्या शोधात आला होता. याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. एका पोलिसाला बनावट ग्राहक म्हणून आरोपीकडे पाठविण्यात आले. व्यवहार सुरू होताच पथकाने शब्बीरला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन गावठी पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे आणि अन्य साहित्य असा एकूण एक लाख ६६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे मध्य प्रदेशातून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या बेकायदेशीर शस्त्रपुरवठ्याचा आणखी एक दुवा पोलिसांसमोर आला असून मुख्य पुरवठादार पप्पी सिंगचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT