

मोशी: चिखली परिसरातील पिंगळेरोड, सोनवणेवस्ती परिसरात सातत्याने विजेचा लंपडाव सुरू आहे. तर मोरेवस्ती येथील राजगड पार्क परिसरातील गल्ली क्र. ५ मधील केबलमध्ये गुरुवारी (दि. २५) पुन्हा तांत्रिक बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला. गेल्या महिनाभरात मोरेवस्ती परिसरात तब्बल चार वेळा भूमिगत वीज केबलमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला आहे.
मोरेवस्ती येथील अष्टविनायक चौक परिसरात १३ जून रोजी सुमारे १४ तास वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर त्याच ठिकाणी लगेचच दोनच दिवसांनी केबलमध्ये बिघाड होऊन १५ तास वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा राजगड पार्क येथे केबलमध्ये बिघाड होऊन १२ तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर गुरुवारी (दि. २५) पुन्हा राजगड पार्क परिसरातील गल्ली क्र. ५ येथील केबलमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला.
केबलमध्ये बिघाड होण्याबरोबरच मोरे वस्ती, चिखली आदी परिसरात दररोजच अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे विजेची घरगुती उपकरणांमध्ये बिघाड होऊन जळाल्याच्या घटना घडत आहेत. या परिसरात केबलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने केवळ दुरुस्ती करण्याऐवजी संपूर्ण जुनी केबल बदलणे आवश्यक बनले आहे. मात्र, जुन्या केबल्स बदलण्याऐवजी महावितरणकडून तात्पुरती दुरुस्ती केली जात असल्याने विजेची समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कायमस्वरूपी तोडगा काढा
एकदा केबलमध्ये बिघाड झाल्यानंतर तो शोधून दुरुस्त करेपर्यंत किमान १२ ते १५ तास वीज गायब होते. त्यामुळे दुकानदार, छोटे उद्योजक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचबरोबर नागरिकांनाही रात्र अंधारात काढावी लागते. स्वयंपाकाची घरगुती उपकरणे, पाणीपुरवठा इत्यादी दैनंदिन कामे अडून पडतात. वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यावर उपाययोजना करण्यासाठी केबल बदलून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी नागरिकांची मागणी आहे. प्रभाग एकमध्ये सातत्याने विजेची समस्या येते. त्यामुळे महावितरणच्या संबधिंत अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी तोडगा काढून समस्या मार्गी लावावी. ज्यामुळे नागरिकांना सातत्याने होणारा विजेच्या लंपडावाच्या त्रासातून सूटका मिळेल.
याबाबत माहिती घेऊन येथील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील
विश्वनाथ लहाने, कार्यकारी अभियंता, भोसरी विभाग, महावितरण