Pimpri Demolition Drive Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Demolition Drive: चिखली-कुदळवाडीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई; चार प्रार्थनास्थळे जमीनदोस्त

महापालिकेची मोठी धडक कारवाई; 1200 पोलिस बंदोबस्तात पहाटे दोन तासांत मोहीम पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने चिखलीतील कुदळवाडी व जाधववाडी परिसरातील चार प्रार्थनास्थळांसह अनधिकृत बांधकामांवर सोमवार (दि. 11) पहाटे कारवाई केली. जमीनदोस्त करण्यात आलेली अनधिकृत प्रार्थनास्थळे ही खासगी जागेत होती. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.

कारवाईमध्ये कुदळवाडी येथील विसावा चौक ते पोलिस चौकी रस्त्यावरील गट क्रमांक 700 मधील अनधिकृत पत्राशेड, जाधववाडी रस्ता येथील अनधिकृत वीट बांधकाम पत्राशेड, कुदळवाडी पोलिस चौकीजवळील गट क्रमांक 678 मधील अनधिकृत आरसीसी बांधकाम तसेच, जाधववाडीतील सावता माळी मंदिर रस्ता येथील अनधिकृत पत्राशेड पाडण्यात आले. यामध्ये चार प्रार्थनास्थळांचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पहाटेच्या वेळेत पार पडली. या वेळी बांधकाम परवानगी विभागाचे 12 उपअभियंते, 4 कनिष्ठ अभियंते, 24 बीट निरीक्षक, कर्मचारी यांच्या पथकाने तब्बल 1 हजार 200 पोलिसांचा तसेच, 218 एमएसएफ जवानांच्या बंदोबस्तात आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कारवाई दोन तासांत पूर्ण करण्यात आली. कारवाईमध्ये अंदाजे 4 हजार 336.28 चौरस फूट क्षेत्रफळावरील बांधकामे व पत्राशेड हटविण्यात आले.

अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई सुरूच राहणार

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अनधिकृत बांधकामे तसेच, प्रार्थनास्थळे उभारू नयेत. नियमबाह्य बांधकामांविरोधात महापालिका प्रशासनाची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करून शहराच्या नियोजनबद्ध विकासाला सहकार्य करावे, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

महापालिका भवनातील बंदोबस्तात वाढ

कुदळवाडी परिसरातील अनधिकृत प्रार्थनास्थळावर कारवाई केल्याने महापालिका भवनात सोमवारी दिवसभर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापालिका भवनाच्या अण्णासाहेब मगर पुतळ्याजवळील प्रवेशद्वार टाळे लाऊन बंद करण्यात आले होते. महापालिकेत ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येत होता. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांसह मेस्कोचे जवान उपस्थित होते.

एकाच भागात जाणीवपूर्वक कारवाई?

चिखलीतील कुदळवाडीत महापालिकेकडून फेब्रुवारी 2025 मध्ये धडक कारवाई करीत 4 हजार 500 पेक्षा अधिक भंगार गोदाम व दुकाने, आस्थापना, लघुउद्योग, घरांवर कारवाई करत 825 एकर जागा रिकामी करण्यात आली. त्या कारवाईत अनेक लघुउद्योजक, व्यावसासिक व कामगार बेरोजगार झाले. त्यानंतर तेथील प्रार्थनास्थळावर सोमवारी पहाटे कारवाई करण्यात आली. त्यामुळे राजकीय दबावाखाली तसेच, सूडबुद्धीने एकाच भागात सातत्याने कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. शहरभरात महापालिकेच्या आरक्षित तसेच, खासगी जागेत मोठ्या संख्येने अनधिकृत प्रार्थनास्थळे आहेत. त्यावर कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT