

पिंपरी: खासगी रुग्णालयातील महागड्या उपचारांऐवजी ईएसआय रुग्णालय कामगारांसाठी सोयीचे आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 16 लाख 28 हजार कामगार आहेत. त्यातील केवळ 6 लाख 50 हजार कामगारांची ईएसआय नोंदणी झाली आहे. त्यांच्या पगारातून दरमहा ठराविक रक्कम ही आरोग्य सुविधेसाठी कपात केली जाते; मात्र दुसरीकडे उपचाराची वेळ आल्यास या कामगारांना वणवण करावी लागत आहे.
कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) ही कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. शहरातील प्रत्येक कामगारांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी चिंचवड मोहननगर येथे कामगार राज्य विमा महामंडळाचे (ई.एस.आय.सी) एक रुग्णालय आहे. सध्या शहरात सुमारे साडे 6 लाख 50 हजार कामगारांची नोंद आहे. पिंपरी-चिंचवड आणि चाकण, तळेगाव, राजगुरुनगर या एमआयडीसी परिसरामधील कंपन्यांमधील कामगारांचा समावेश आहे.
अनेक कंपन्यांमधील कामगारांच्या वेतनातून ईएसआयचे योगदान नियमितपणे कापले जाते. नियमानुसार, कामगारांना या बदल्यात मोफत आणि उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळणे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात रुग्णालयात गेल्यावर लांबच लांब रांगा, कागदपत्रांची अडवणूक आणि तांत्रिक अडचणींचे कारण देऊन रुग्णांना ताटकळत ठेवले जाते. डॉक्टर्स व्यवस्थित बोलत नाही. तपासणी करत नाही. उपचारात टोलवाटोलवी केली जाते. कंत्राटी कामगारांना तर या सुविधांचा लाभ घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
डॉक्टरही वेळेवर उपलब्ध नाहीत:
विमा योजनेच्या पॅनेलवरील रुग्णालयांची संख्या कमी आहे. कधी डॉक्टर्स उपलब्ध नसतात, तर कधी महिनोंमहिने अपॉईंटमेंट मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने कामगार खासगी रुग्णालयात उपचार करून घ्यावे लागतात. विमा योजनेचा पॅनेलवर जे रुग्णालय आहेत, त्यात महिला, पुरुषांसाठी असलेले वॉर्ड नियमानुसार नाहीत. डॉक्टरही वेळेवर उपलब्ध नसतात. कामगारांची हेळसांड होत असल्याबद्दल कामगार नाराजी व्यक्त करतात आहे. ईएसआय रुग्णालयामध्ये दररोज शेकडो कामगार उपचारासाठी येतात. अनेक कामगारांनी तक्रार केली आहे की, रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांनाही खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे गरीब कामगारांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत.
काही रुग्णांचे कागदपत्रे पूर्ण नसतात. तर कधी इथे शक्य नसल्यास संबंधित रुग्णास भागीदारी (टायप) रुग्णालयात पाठवावे लागतात. तेव्हा संबंधित रुग्णाचे नाव, जन्मतारखा सर्व बरोबर असणे गरजेचे आहे. त्यामध्ये काही चूक आढळल्यास संबंधित रुग्णालयाकडून त्या रुग्णास दाखल करून घेतले जात नाही. त्या वेळी संबंधित रुग्णास उपचारासाठी अडचण येते.
वर्षा सुपे (वैद्यकीय अधीक्षक ईएसआय रुग्णालय)