Crime News Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Mother Son Death Case: डांगे चौकात १८व्या मजल्यावरून पडून आई-मुलाचा मृत्यू; घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट

सिग्नेचर पार्क सोसायटीतील धक्कादायक घटना; सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे वाकड पोलिसांचा तपास

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: डांगे चौक परिसरातील उच्चभ्रू सिग्नेचर पार्क सोसायटीच्या अठराव्या मजल्यावरून इमारतीच्या अंतर्गत डक्टमध्ये पडून आई आणि सहा वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (दि. ३०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. घटनेपूर्वी महिला मुलासह लिफ्टने अठराव्या मजल्यावर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले आहे. तसेच, गॅलरीच्या कठड्याजवळ दोघांची पादत्राणे सापडल्याने आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एकता मनोज भांगड (वय ३३) आणि माधव मनोज भांगड (वय ६) अशी मृत आई आणि मुलाची नावे आहेत. एकता यांचे पती मनोज भांगड (वय ३५) हे येरवडा येथील एका आयटी कंपनीत कार्यरत आहेत. भांगड कुटुंब मूळचे राजस्थान येथील असून, गेल्या दोन वर्षांपासून डांगे चौकातील सिग्नेचर पार्क सोसायटीच्या सातव्या मजल्यावर वास्तव्यास होते.

शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास मनोज नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्या वेळी घरात पत्नी एकता आणि मुलगा माधव होते. दरम्यान, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीच्या अंतर्गत डक्टमधून मोठा आवाज आला. त्यामुळे रहिवाशांनी खाली धाव घेतली. त्या वेळी एकता आणि माधव हे दोघे खाली पडल्याचे आढळले.

या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एकता या मुलगा माधव याला घेऊन लिफ्टने अठराव्या मजल्यावर गेल्याचे दिसून आले. तेथे पादत्राणे काढून ठेवल्याचेही फुटेजमध्ये आढळले. प्राथमिक तपासात एकता यांनी मुलासह अठराव्या मजल्यावरून उडी घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेनंतर फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवले आहेत. संबंधितांच्या नातेवाइकांनाही घटनेची माहिती दिली आहे. एकता यांनी मुलासह टोकाचे पाऊल का उचलले असावे, यामागे काही कौटुंबिक किंवा अन्य कारण होते का, याचा वाकड पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT