बजरंग मासाळ
पिंपळे निलख: पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, नवीन सांगवी, जुनी सांगवी, परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे पादचारी मार्ग अक्षरशः उद्ध्वस्त होत असल्याचे दिसत आहे. संबंधित बांधकामांना अधिकृत परवानग्या असल्या तरी कामाच्या पद्धतीवर कोणतेही नियंत्रण नसल्याने सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवजड वाहनांमुळे पदपथ, सायकल ट्रॅक आणि रस्त्यालगतची संरचना पूर्णपणे दबली जात असून, नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे.
वाहनांमुळे ड्रेनेजचे झाकणे तुटली
बांधकामाच्या ठिकाणी क्रेशर, मिक्सर,आरएमसी ट्रक आणि डंपर ही अवजड वाहने थेट पादचारी मार्गावर चढवली जात आहेत. परिणामी, आधीच अतिक्रमणामुळे अडथळलेले पदपथ पूर्णपणे निकामी होत आहेत. या वाहनांच्या वजनामुळे ड्रेनेजची झाकणे खचत आहेत. तर, लोखंडी रेलिंग तुटत आहेत आणि रस्त्यालगतची झाडेही मोडून पडत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेले सायकल ट्रॅक सुद्धा या निष्काळजीपणामुळे खराब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
प्रदुषणात वाढ
या सगळ्याचा सर्वांधिक फटका ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना बसत आहे. पादचारी मार्ग वापरण्यायोग्य नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. दिवसरात्र सुरू असलेल्या या बांधकामांमुळे ध्वनी व धुळीचे प्रदूषणही वाढले असून, परिसरातील रहिवाशांचा संताप उफाळून येत आहे. परवानगी आहे म्हणून मनमानी चालणार का? असा सवाल नागरिक प्रशासनाला करत आहेत.
संबंधितांवर कारवाईची मागणी
सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे, या नुकसानाची जबाबदारी नेमकी कोण घेणार? बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार की संबंधित प्रशासन? सार्वजनिक मालमत्तेची हानी होत असताना याकडे दुर्लक्ष का केले जाते, असा रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी आणि नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
आम्ही लगेच विभागीय आरोग्य रक्षकांना त्या ठिकाणी पाहणी करण्यास सांगू. राडारोडा आढळल्यास तो त्वरित उचलण्याच्या सूचना दिल्या जातील व गरज भासल्यास दंडात्मक कारवाईही करण्यात येईल.शांताराम माने, आरोग्य विभागीय अधिकारी, क्ष्ोत्रिय कार्यालय
कारवाईचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान थांबलेले दिसत नाही. आम्हाला आश्वासन नाही तर, तात्काळ आणि ठोस कारवाई हवी आहे. नागरिकांना रस्त्यावर उतरून चालावे लागते, ही परिस्थिती बदलणे ही सर्व संबंधित विभागांची संयुक्त जबाबदारी आहे.’रवी काळे, सामाजिक कार्यकर्ते
विभागीय कर्मचाऱ्यांना पाहणी करण्यास सांगितले जाईल व उपनगरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी असे अतिक्रमण आढळून येईल, तिथे दंडात्मक कार्यवाही केली जाईल.पूजा राठोड, बांधकाम अतिक्रमण अधिकारी, विभाग ड क्ष्ोत्रिय कार्यालय
बिल्डिंग परमिशन विभागाला आम्ही पत्र देऊन ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार आढळून येतील, त्या ठिकाणची सविस्तर माहिती पाठवली जाईल. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानाची नोंद करून पुढील कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल.सुनील शिंदे, उपअभियंता, स्थापत्य विभाग क्ष्ोत्रिय कार्यालय
आम्ही तात्काळ संबंधित बांधकामस्थळी जाऊन पाहणी करू. झाडांच्या होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेऊन संबंधित विभागाला पत्र देण्यात येईल व झाडांना कोणतीही इजा न पोहोचवता पर्यायी उपाययोजना अवलंबण्याचे निर्देश दिले जातील.अनिल गायकवाड, उद्यान प्रकल्प विभाग, क्ष्ोत्रिय कार्यालय