पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 128 जागा आहेत. त्यापैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव आहेत. खुल्या गटातून महिला निवडून आल्यास नगरसेविकांची संख्या 64 पेक्षा अधिक होणार आहे. त्यामुळे महापालिकेत महिलाराज येण्याची शक्यता आहे; तसेच महिलांच्या जागा खुल्या गटातील जागांच्या बरोबरीने असल्याने अनेकांची गोची झाली आहे. कुटुंबात पर्यायी योग्य महिला उमेदवार नसल्यास काहींना निवडणूक रिंगणातून माघार घेण्याची वेळ येऊ शकते. (Latest Pimpri chinchwad News)
महापालिकेची निवडणूक जानेवारी 2026 ला होत आहे. महापालिकेच्या एकूण 128 जागांपैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव आहेत; मात्र अनुसूचित जमाती (एस.टी) च्या तीनपैकी दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती (एस.सी), इतर मागास वर्ग (ओबीसी), खुल्या (ओपन) गटात महिलांसाठी अर्ध्या जागा राखीव आहेत. त्यामुळे त्या जागांवर पुरूषांना लढता येत नाही. तसेच, एकूण 32 प्रभागांतील प्रत्येक प्रभागात दोन जागा या महिलांसाठी राखीव आहेत.
महिला आरक्षणामुळे अनेक पुरूष इच्छुकांची निवडणुकीची संधी हुकू शकते. प्रभागातील जागा न सुटल्यास तसेच, कुटुंबातील किंवा नात्यात सक्षम योग्य महिला उमेदवार नसल्यास त्यांना निवडणूक लढता येणार नाही. आजूबाजूच्या प्रभागात नशीब आजमावयाचे म्हटले तरी, मोठ्या प्रमाणात वाढलेल्या मतदार संख्येपर्यंत पोहण्यासाठी पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. कमी कालावधीत प्रचार यंत्रणा राबविणे अवघड आहे. त्यासाठी भरमसाट खर्च पेलावा लागणार आहे. सर्व बाबी तपासल्यास निवडणूक रिंगणात माघार घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. परिणामी, प्रभागात केलेला खर्च तसेच, केलेले काम वाया जाणार आहे. इच्छा नसतानाही इतर उमेदवारांचा प्रचार करण्याची वेळ येऊ शकते. अशा बिकट स्थितीमुळे काही इच्छुकांसमोर पेच निर्माण झाला आहे.
अराखीव जागेवर महिला लढू शकतात
अराखीव गटात कोणीही उभे राहू शकतो. एससी, एसटी, ओबीसी आणि ओपन गटात महिलांसाठी एकूण 64 जागा राखीव आहेत. त्या जागेवर त्या वर्गातील महिलाच उभ्या राहू शकतात. मात्र, त्या-त्या वर्गातील महिला अराखीव जागेवरही निवडणूक लढवू शकतात, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
नऊ वर्षानंतर निवडणूक होत असल्याने इच्छुक महिला, युवतींची संख्या वाढली
फेबुवारी 2017 नंतर आता महापालिकेची निडणूक होत आहे. त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. अनेक अनुभवी माजी नगरसेविका शहरात कार्यरत आहेत. राजकारणात आलेल्या महिला व युवतींची संख्याही मोठी आहे. पक्षाच्या विविध आघाड्यांवर महिला व युवती पदाधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. आंदोलन, मोर्चा, धरणे आदीत महिलांचा संख्या लक्षणीय आहे. पर्यायाने प्रभागाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक महिला सरसावल्या आहेत. त्या निवडणूक रिंगणात उतरुन स्वत:ला आजमावणार आहेत. निवडणूक मैदानात महिलांची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे पुरुष उमेदवारांना कडवी लढत द्यावी लागू शकते.
संपूर्ण कारभार नगरसेविकांच्या हाती जाण्याची शक्यता
खुल्या गटातून जिंकल्यास नगरसेविका संख्येत वाढ
अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी) आणि खुल्या (ओपन) गटातील खुल्या जागेवर महिला उमेदवारांना निवडणूक लढता येते. त्या जागेवर महिला निवडून आल्यास महापालिकेत नगरसेवकांपेक्षा नगरसेविकेची संख्या अधिक होणार आहे. नगरसेविकांची एकजूट असल्यास महापालिकेचा संपूर्ण कारभार नगरसेविकांच्या हाती जाण्याची शक्यता आहे.
फेबु्रवारी 2012 ला नगरसेविकांची संख्या होती अधिक
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेबुवारी 2012 ला झालेल्या निवडणुकीत द्विसदस्यीय प्रभाग रचनेत एकूण 128 जागा होत्या. त्यात 64 ऐवजी 66 महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 26 मधील दोन्ही सदस्य या महिला होत्या. त्यावेळेस महापालिका सभागृहात नगरसेविकेची संख्या नगरसेवकांपेक्षा दोनने अधिक होती. अर्थात महापालिकेत महिलराज होते. फेबुवारी 2017 च्या चार सदस्यीय प्रभाग निवडणुकीत 128 पैकी 64 महिला निवडून आल्या होत्या.
संधी हुकली तरी मिळू शकते
स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी
निवडणुकीत संधी हुकली तरी, इच्छुकांना महापालिकेच्या सभागृहात प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी त्या पक्षाचे नगरसेवक संख्या अधिक असणे आवश्यक आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून पाचजणांना संधी मिळते. ते महापालिका सभेत तसेच, कामकाजात सहभागी होऊ शकतात. तसेच, सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयातही तब्बल 24 स्वीकृत सदस्य निवडले जातात. एका क्षेत्रीय कार्यालयात तीन स्वीकृत सदस्य असतात. तेथेही इच्छुकांना संधी मिळू शकते. अशा तऱ्हेने तब्बल 29 जणांना निवडणूक न लढता महापालिकेत प्रवेश मिळतो.