

लोणावळा : लोणावळा व तळेगाव दाभाडे नगर परिषद तसेच वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्जांची छाननी अर्ज माघारी या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांना निवडणुकीचे चिन्ह वाटप केले जाणार आहे. दोन डिसेंबर ही प्रत्यक्ष मतदानाची तारीख आहे. उमेदवाराला चिन्ह वाटप झाल्यानंतर मतदानाच्या तारखेपर्यंत केवळ सहा दिवसांचा अवधी मिळत आहे. त्यातही जाहीर प्रचार मतदानाच्या 24 तास अगोदर बंद होणार आहे. त्यामुळे जेमतेम पाच दिवसांमध्ये उमेदवारांना त्यांचे निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवावे लागणार आहे.(Latest Pimpri chinchwad News)
राजकीय पक्ष जे स्वबळावर लढणार आहेत. त्यांचे चिन्ह हे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. मात्र, जे उमेदवार अपक्ष अथवा स्थानिक युती आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार आहे, त्यांना मात्र निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले व त्याच क्षणापासून आचारसंहिता लागू झाली. जेमतेम 28 दिवसांचा हा संपूर्ण कार्यक्रम असून, 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
मागील चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. काही ठिकाणी त्यावरूनही अधिक काळ लोटला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षानंतर निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यातच निवडणुका वेळेत होणारे की पुन्हा पुढे ढकलल्या जाणार असे तर्क लढवले जात असताना निवडणूक आयोगाने अचानक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या व कमी कालावधीमध्ये संपूर्ण कार्यक्रम घोषित केला. त्यामुळे इच्छुक उमेदवार व राजकीय पक्ष यांचीदेखील पळापळ सुरू झाली आहे.
मावळ तालुक्यामध्ये अद्याप नगराध्यक्ष पदाचे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवारदेखील कोणते राजकीय पक्षाकडून जाहीर करण्यात आलेले नाहीत. इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे व बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान पक्षांसमोर असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत ही उत्सुकता ताणली जाणार आहे. मात्र, त्यानंतर उमेदवारांनादेखील आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे मोठे जिकिरीचे ठरणार आहे. स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या राजकीय पक्षांसाठी पुरेसा कालावधी प्रचार व निवडणूक चिन्ह पोहोचवण्यासाठी मिळणार आहे. मात्र, अपक्ष उमेदवार तसेच आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवू इच्छिणाऱ्यांसाठी हे आव्हानात्मक असणार आहे.
सध्या सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सर्वांधिक प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रत्येक मतदार हा सोशल मीडिया वापरत असेल किंवा पहात असेल असेही नसल्यामुळे प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचणे हेदेखील इच्छुकांना व त्यांच्या समर्थकांना करावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.
निवडणूक लढवण्यासाठी प्रबळ इच्छुक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आतापर्यंत गाठीभेटीच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. आपण निवडणूक लढणारच या मतावर अनेक जण ठाम आहेत. इच्छुकांचा चेहरादेखील मतदारांच्या नजरेमध्ये भरलेला आहे. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर पुन्हा एकदा चिन्हासह इच्छुकांना मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे.