

पिंपरी : चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीत शहरातील 7 लाख 40 हजार मालमत्ताधारकांपैकी 4 लाख 77 हजार 284 मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरला आहे. त्यापैकी 3 लाख 93 हजार 771 मालमत्ताधारकांनी ऑनलाईन माध्यमातून घरबसल्या बिलाचा भरणा केला आहे. ती रक्कम तब्बल 515 कोटी रुपये इतकी आहे. (Latest Pimpri chinchwad News)
गेल्या दहा वर्षांत ऑनलाईन मालमत्ताकर भरण्यास प्रतिसाद वाढत आहे. नागरिक घरबसल्या स्मार्ट मोबाईलवरून विविध प्रकाराची बिले भरतात. तसेच, सर्वत्र ऑनलाईन व्यवहार करण्यास मोठी पसंती दिली जात आहे. परिणामी, सर्वत्र ऑनलाईनचा व्यवहार मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे मालमत्ताकर भरण्यासही ऑनलाईनला मोठी पसंती दिली जात आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑलनाईन कर भरता येतो. त्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या मालमत्तेची माहिती, थकबाकी रक्कम, पावती डाउनलोड तसेच, सवलतींचा तपशील एकाच ठिकाणी पाहता येतो. सुरक्षित पेमेंट आणि सुलभ वापरामुळे नागरिकांचा या डिजिटल माध्यमावर विश्वास वाढला आहे. एक एप्रिल ते 6 नोव्हेंबर 2025 या चालू आर्थिक वर्षात 631 कोटी 66 लाख रुपयांचा मालमत्ताकर जमा झाला आहे. त्यात ऑनलाईन माध्यमातून 515 कोटी रुपये जमा झाले आहेत, असे उपायुक्त पंकज पाटील यांनी सांगितले.
ऑनलाईन 515 कोटी
रोख 43 कोटी 20 लाख
धनादेश 38 कोटी 66 लाख
डिमांड ड्राफ्ट 1 कोटी 89 लाख