बजरंग मासाळ
पिंपरी: एकेकाळी उत्पादन क्षेत्रात महिलांची भूमिका काही विभागांपुरती मर्यादित मानली जात होती. मात्र, आज पिंपरी-चिंचवडच्या उद्योगनगरीत हे चित्र वेगाने बदलत आहे. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, गुणवत्ता तपासणी, असेंब्ली, वेअरहाऊसिंग आणि उत्पादन व्यवस्थापन अशा विविध विभागांत महिला कर्मचारी अधिक सक्षमपणे जबाबदाऱ्या सांभाळताना दिसत आहेत. या कुशल महिला कर्मचाऱ्यांमुळे उद्योगांतील उत्पादन प्रक्रियेचा वेगही वाढल्याचे संबंधित कंपन्यांच्या मानव संसाधन विभागाकडून सांगण्यात येत आहे.
शहरातील विविध उद्योगांना दैनिक पुढारी प्रतिनिधीने भेट देऊन मानवसंसाधन विभाग, उद्योजक आणि महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यातून एक बाब प्रकर्षाने समोर आली की, उद्योगांना कुशल पुरुष कर्मचारी जितके महत्त्वाचे आहेत, तितक्याच कुशलतेने महिला कर्मचारीही उत्पादन व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनत आहेत. मानवसंसाधन विभागांच्या म्हणण्यानुसार, महिला कर्मचाऱ्यांमध्ये वेळेचे पालन, कामातील सातत्य, गुणवत्ता राखण्याची सवय आणि दीर्घकाळ एकाच संस्थेशी जोडून राहण्याची प्रवृत्ती, अशी गुणवैशिष्टये संबंधित मानव संसाधन विभागाकडून सकारात्मक बाब सांगण्यात येत आहे. मात्र याचा अर्थ पुरुष कर्मचारी कमी सक्षम आहेत असा नाही. उलट, आजच्या उद्योगविश्वात दोघांच्याही कौशल्यांचा समतोल उद्योगांच्या प्रगतीसाठी तितकाच आवश्यक असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
पारंपरिक चौकटीला छेद
उद्योग क्षेत्रात महिलांची उपस्थिती आता केवळ पॅकेजिंग किंवा कार्यालयीन कामांपुरती मर्यादित राहिलेली नाही. सीएनसी मशीन, अकाउंट विभाग ,गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन नियोजन, लॉजिस्टिक्स, वेअरहाऊस व्यवस्थापन आणि तांत्रिक विभागांमध्येही महिला आत्मविश्वासाने काम करत आहेत. त्यामुळे “महिलांसाठी काही विशिष्ट कामे” ही पारंपरिक चौकट हळूहळू मोडताना दिसत आहे.
उद्योग विश्वात बदलती ओळख
पिंपरी-चिंचवडची उद्योगनगरी वेगाने बदलत आहे व या बदलात महिलांचा सहभाग केवळ रोजगाराच्या आकडेवारीपुरता मर्यादित नाही, तर उत्पादन, गुणवत्ता आणि औद्योगिक संस्कृती मजबूत करण्यातही त्यांचे योगदान वाढत आहे. उद्योगांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे आणि त्या गरजेची पूर्तता करण्यात महिला कर्मचारीही तितक्याच सक्षमपणे पुढे येत आहेत. उद्योगविश्वातील ही बदलती ओळख आगामी काळात महिला सहभागाला आणखी नवी दिशा देऊ शकते.
कुशल महिला कर्मचाऱ्यांमुळे उद्योगांना काय फायदे?
अनावश्यक रजेचे प्रमाण तुलनेने कमी
नोकरी वारंवार बदलण्याचे प्रमाण कमी
अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे जबाबदाऱ्या वाटप करणे सोपे
नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याची भूमिका
उत्पादन प्रक्रियेत सातत्य राखण्यास मदत
उत्पादनाची गुणवत्ता व कार्यक्षमता वाढण्यास हातभार
कौशल्य टिकून राहिल्याने संस्थेची उत्पादकता आणि स्थैर्य मजबूत.
अजूनही काही आव्हाने…
रात्रीच्या शिफ्टमधील सुरक्षितता अधिक बळकट करण्याची गरज.
सुरक्षित व वेळेवर वाहतूक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक.
बालसंगोपन सुविधा उद्योगांमध्ये उभारण्याची आवश्यकता.
कौशल्यवृद्धी व नवीन तंत्रज्ञानाचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.
समान संधी व करिअर प्रगतीसाठी अनुकूल कार्यसंस्कृती विकसित करणे.
कार्यस्थळी सुरक्षित व भेदभावमुक्त वातावरण अधिक मजबूत करणे गरजेचे.
कर्मचारी भरती करताना आम्ही महिला किंवा पुरुष असा विचार करत नाही. आवश्यक कौशल्य, गुणवत्ता आणि कामावरील बांधिलकी हेच निकष असतात. आमच्या अनुभवात अनेक महिला कर्मचारी दीर्घकाळ संस्थेत राहून वरिष्ठतेनुसार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यामुळे उत्पादनात सातत्य राखण्यास मदत होते.आकाश ठाकूर, उत्पादन विभाग एच. आर.
कारखान्यातील काम म्हणजे केवळ नोकरी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. सुरुवातीला अनेक शंका होत्या; पण प्रशिक्षण, अनुभव आणि मेहनतीच्या जोरावर आज आम्ही कोणतेही काम आत्मविश्वासाने करू शकतो. मी घर व नोकरी दोन्ही सांभाळते.मोहिनी सलगर, वेअरहाउस अकाउंटंट
उद्योगाची प्रगती ही महिला किंवा पुरुष यावर अवलंबून नसून कुशल मनुष्यबळावर अवलंबून असते. आज अनेक महिला कर्मचारी गुणवत्ता, शिस्त आणि सातत्यामुळे उद्योगविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांचा सहभाग वाढणे ही उद्योगांसाठी सकारात्मक बाब आहे. आणि यापुढेही महिलांची संख्या वाढवण्यावर भर देत आहोत.सीमा राज रजपूत, उद्योजक.
महिलांचे सक्षमीकरण हे केवळ रोजगारापुरते मर्यादित नसून त्यांना कौशल्याच्या बळावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा आमचा उद्देश आहे. २००६ पासून संस्थेतून सुमारे २,४०० प्रशिक्षणार्थिनींनी विविध व्यवसायांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यापैकी अनेक जणी उद्योगांमध्ये कार्यरत आहेत, काहींनी स्वयंरोजगार स्वीकारला, तर काहींनी उच्च शिक्षणाचा मार्ग निवडला आहे. कमी खर्चात दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण आणि आता महापालिकेकडून मिळणारे मासिक ५०० रुपये विद्यावेतन यामुळे अधिकाधिक महिलांनी कुशल कारागीर बनून स्वतःसह कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहेत.ज्योत सोनवणे, प्रभारी प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला)