

भोसरी: पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरांत मागील काही दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील बहुतांश भागांत पाणी साचले, रस्ते जलमय झाले तर अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन, स्ट्रॉर्मवॉटर लाइन ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आले. अशा परिस्थितीत स्थानिक नागरिक व प्रशासनाने पाण्याला वाट करून देण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदले परंतु याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पाऊस जाऊनही रस्त्यातील खड्डे तसेच म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.
भोसरी परिसरात नुकत्याच झालेल्या पावसाने महापालिकेच्या नियोजनाचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिसरात अनेक ठिकाणी पावसाळी चेंबर तुंबल्याने सर्वत्र पाण्याचे तळे साचले होते. पाणी घरात आणि परिसरात साचल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने घाईघाईत जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून दुसऱ्या चेंबरकडे पाण्याला मार्ग करून दिला. त्या वेळी ही उपाययोजना योग्य वाटली; मात्र पावसाचे पाणी ओसरल्यानंतर खोदलेला रस्ता पूर्ववत करण्याचे प्रशासनाला जणू विसर पडल्याचे दिसून येत आहे. परिणामी रस्ता खोदलेल्या अवस्थेतच असून, परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. भोसरीतील शिवशक्ती मित्र मंडळ चौक ते हिंदी शाळा परिसर नुकत्याच झालेल्या पावसात जलमय झाला होता. अनेक नागरिकांच्या घरांत पाणी शिरले,
संसाराचे नुकसान झाले आणि प्रशासनाची यंत्रणा खडबडून जागी झाली. पाण्याचा निचरा करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून दुसऱ्या चेंबरकडे पाण्याला मार्ग करून देण्यात आला. मात्र, त्यानंतर प्रशासनाने या कामाकडे अक्षरशः पाठ फिरवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाऊस थांबला, पाणी ओसरले; पण खोदलेला रस्ता आजही डागडुजीच्या प्रतीक्षेत आहे. एका समस्येवर तोडगा काढताना दुसरी समस्या निर्माण करणे, हीच महापालिकेची कार्यपद्धती आहे का, असा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने या खोदलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
नागरिक, विद्यार्थी यांना धोका
याठिकाणी दाट लोकवस्ती, हिंदी शाळा, विद्यार्थी, पालक आणि वाहनांची वर्दळ असते. वळणावर असलेला हा खोदलेला भाग अपघाताला आमंत्रण देत आहे. एखादा दुचाकीस्वार पडला किंवा विद्यार्थ्याला दुखापत झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? महापालिका की स्थानिक लोकप्रतिनिधी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
महापालिका प्रशासनाची कार्यपद्धती गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरती उपाययोजना करणे आवश्यक असते. मात्र, परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्ती करणे हीदेखील प्रशासनाची तितकीच मोठी जबाबदारी आहे. काम अर्धवट सोडण्याची वृत्ती अनेकदा दुर्घटनेला आमंत्रण देते आणि नागरिकांच्या जीवावर बेतते. भोसरीत ज्या भागात रस्ते खोदले आहेत तेथील दुरुस्ती प्रशासनाने तात्काळ करावी.
साहेबराव लांडगे, स्थानिक नागरिक.