पिंपळे गुरव: एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे, तर दुसरीकडे काही ठिकाणी पाइप लावून चारचाकी वाहनांची धुलाई केली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि शहरातील पाणीपुरवठ्यावर आलेली मर्यादा, अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा सुरू असलेला हा अपव्यय संतापजनक ठरत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू केली आहे. मात्र, दुसरीकडे काही नागरिकांकडून पाण्याचा वापर वाहनधुण्यासाठी बिनदिक्कतपणे केला जात आहे. पाइपद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडून चारचाकी गाड्या धुतल्या जात असल्याचे चित्र छायाचित्रांतून समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेची पाणीकपात नेमकी कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाण्याचा मोठा अपव्यय
राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना शेतीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शहरातही पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा वेळी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अपेक्षित असताना वाहनधुण्यासाठी पाइपद्वारे पाणी सोडले जात आहे. एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे पाण्याचा असा अपव्यय होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा
पाणी ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही सामाजिक कर्तव्य आहे. दुष्काळसदृश परिस्थिती आणि भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा वापर वाहनधुलाईसाठी टाळणे गरजेचे आहे. महापालिकेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करून धडक तपासणी मोहीम राबवावी. तसेच नागरिकांनीही पाणी जपून वापरावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रशासनाची बघ्याची भूमिका
केवळ १० टक्के पाणीकपात लागू करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. शहरातील विविध भागांत पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. पाइप लावून वाहनांची धुलाई करणाऱ्यांना समज देण्यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.